देवेंद्र फडणवीसांचा टोला
नागपूर : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर विमानतळावर त्याचे आगमन झाल्यावर प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. मात्र, जे नियमात असेल ते करु असे वक्तव्य फडणवीसांनी केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा काय निर्णय आहे हे मला माहिती नाही. ते मेळावा घेणार की नाहीत याचीही मला कल्पना नाही. उद्धव ठाकरे मेळावा घेणार का नाही याची देखील मला कल्पना नाही. पण गृहमंत्री म्हणून मी एवढच सांगू शकतो की, दसरा मेळाव्याबाबत जे नियमात असेल ते करु, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. एकनाथ शिंदे यांच्याकडून दसरा मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याबाबत फडणवीस यांनी प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी फडणवीसांनी काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेसची स्थिती ही बुडत्या नावेसारखी झाली आहे. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. त्यासंदर्भात देखील फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी काँग्रेस म्हणजे बुडती नाव असल्याचे फडणवीस म्हणाले. अनेक लोक काँग्रेस सोडत आहेत. त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. मी त्यावर जास्त बोलणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.