मुंबई (प्रतिनिधी) : भास्कर जाधव हे काही बोलले तरी ते महत्त्वाचे नाही. कारण ते विसरले आहेत की उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री नाहीत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आहेत. उद्धव ठाकरे असताना त्यांना भीती होती. भीती देणाराच माणूस होता. पण आताच्या सरकारमध्ये गणेशोत्सवामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना व प्रवाशांचा प्रवास चांगला व सुखकरच होईल, असा विश्वास भाजपचे युवा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा अधिवेशनाचे कामकाज संपल्यावर विधान भवनाच्या आवारात पत्रकारांशी वार्तालाप करताना आमदार नितेश राणे बोलत होते.
सालाबादप्रमाणे यंदाही कोकणातील गणेशोत्सव, चाकरमान्यांचा प्रवास आणि मुंबई-गोवा महामार्ग हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे; परंतु या वर्षी फरक आहे. बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांची ती प्रमुख जबाबदारी असल्याने त्यांनी २६ व २७ ऑगस्टला मुंबई-गोवा महामार्गाचा दौरा आयोजित केलेला आहे. त्यांनी सह्याद्रीवर या संदर्भात सर्व आमदारांची बैठकही आयोजित केली होती. त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या डागडुजीसाठी संबंधितांना २५ ऑगस्ट पूर्वी खड्डे बुजविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यासाठी जी मदत सांगेल ती द्यायला तयार असल्याचे चव्हाण यांनी संबंधितांना सांगितले होते. पाहणी दौऱ्यात मुंबई-गोवा महामार्गावर काय अडचणी आहेत, कारणे काय आहेत याचा आढावा घेतला जाईल. मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारचेच मोठे विघ्न होते; परंतु आता चित्र बदलले आहे. खड्ड्यांचे विघ्न दर वर्षी गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमानी व प्रवाशांपुढेही असायचे, पण ते विघ्न कमी करण्याचे काम या पाहणी दौऱ्यादरम्यानच्या दोन दिवसांत कमी केले जाईल, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
मागील अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना व प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर विघ्न सहन करावे लागले. कोणाला बुकिंग मिळत नसायचे, कोणाला एसटी बस मिळत नसायची, रस्त्याची समस्या वेगळीच असायची, ठेकेदारांची बिले कधी वेळेवर निघाली नाहीत. वर्क ऑर्डर तयार होऊनही कंत्राटदारांना काम मिळत नसायचे. पण यंदा गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना व प्रवाशांना वेगळाच अनुभव येणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.
पत्रकारांनी अन्य प्रश्न विचारताच आमदार नितेश राणे यांनी त्यांना मध्येच थांबवत, कोकणवर अन्याय करू नका, रस्त्याच्या प्रश्नांवर फोकस ठेवा, असे सांगितले. आम्ही गेल्या वर्षी गणेशोत्सवासाठी मोदी एक्स्प्रेस सोडली होती. या वर्षी २९ ऑगस्टला मोदी एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहे. आमचे बंधू माजी खासदार निलेश राणे हेही कोकणवासीयांसाठी भाजपची एक्स्प्रेस सोडणार आहेत.चाकरमान्यांची व प्रवाशांची गणेशोत्सवासाठी जितकी सेवा भाजप कार्यकर्ते करत आहेत, तितकी सेवा अन्य कोणी करणार नाही. बस झाली, ट्रेन झाली, कोकणवासीयांसाठी आता फ्लाइट बाकी आहे. उद्या तीही सेवा दिली जाईल. कोकणासाठी सगळेच नेते एकत्र येत असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.