मुंबई (प्रतिनिधी) : आज-काल कोणाचे काही सांगता येत नाही. कोण कधी कुठे असतो, कोण बाहेर असतो, कोण आत असतो… हे काहीच कळत नाही. आम्ही आता सत्तेत आहोत. पुढची अडीच वर्षे आम्ही खूप चांगले काम करू. आमचे काम इतके चांगले होईल की, त्यानंतरची पुढची पाच वर्षेही आम्ही या बाजूला (सत्ताधारी) राहू. फडणवीस मुख्यमंत्री असताना ते एकटे विरोधी पक्षाला पुरून उरायचे. आता आम्ही दोघे आहोत, म्हणजेच एक से भले दो, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जयंत पाटील यांना प्रत्युत्तर देताना तुफान फटकेबाजी केली.
त्यानंतर चक्क राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी अक्षरश: हात जोडले. त्यामुळे वातावरण अतिशय हलके-फुलके झाल्याचे दिसले. शिंदे म्हणाले, जयंत पाटील यांनी भाषणात माझ्यावर टीका केली होती. निती आयोगाच्या बैठकीच्या वेळी मी मुख्यमंत्र्यांच्या रांगेत सर्वात मागे उभा असल्याचेही सांगितले. पण तेथील बैठक खूप महत्त्वाची असते. अशा वेळी मी काय काम केले, कोणते मुद्दे मांडले, महाराष्ट्रासाठी काय काय मागणी केली… हे सांगायला हवे होते, पण तसे न करता ते रांगेचा मुद्दा धरून बसले. पण लक्षात ठेवा की, येथे रांग महत्त्वाची नसते, तर काम महत्त्वाचे असते आणि जयंत पाटील ज्या प्रकारे बोलत होते, त्यावरून मला असे वाटले की, ते राष्ट्रीय प्रवक्त्यांची जागा घेतात की काय, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला.
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी काँग्रेसबद्दल तर दया येते, असे म्हणून काँग्रेसला मविआमध्येही कमी महत्त्वाचे स्थान मिळाले. आताही विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी नेते पक्षपदी अजितदादा आणि अंबादास दानवे बसले. आताही काँग्रेसला काही मिळाले नाही. त्यांनी कुठे जायचे. बाळासाहेब थोरात अनेकदा माझ्याशी बोलले आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यथा मला माहिती आहेत. पण आता त्यांनाही आमच्या बाजूला घ्यायचे का?, अशी मिस्कील टिपण्णीही केली. जयंत पाटील म्हणत होते की, तुम्ही आमच्या बाजूला या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो. पण तुम्ही मला ही ऑफर देण्याआधी अजितदादांना विचारलं आहेत का… असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली.
आरे येथेच मेट्रो कारशेड
मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कारशेड आरे येथेच उभारली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आरे येथे वन विभागाची एकूण १२८५ हेक्टर जमीन आहे. त्यामध्ये आणखी ३२६ हेक्टर जमिनीचा वन क्षेत्रात समावेश केला आहे. कारशेडसाठी २५ हेक्टर जमीन लागणार आहे. जागेच्या तीनही बाजूंनी रहदारीचे रस्ते आहेत. याबाबत मदान समिती आणि सौनिक समितीनेही आरेतील जागा कारशेडसाठी उपयुक्त असल्याची शिफारस केली आहे, असे ते म्हणाले.
राज्यात ७५ हजार पदांची भरती
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार रिक्तपदांची भरती केली जाईल. विविध विभागांच्या आस्थापनेवरील रिक्तपदांचा आढावा घेतला जात आहे. या जागा भरण्यासाठी ७५ हजार पदांची भरती केली जाणार असल्याचे शिंदे म्हणाले.
राज्यातील गुन्हेगारीत घट
राज्यातील गुन्हेगारीत घट झाली. गुन्हे प्रकटीकरणात वाढ होत आहे. पोलिसांनी मुस्कान अभियानामधून राज्यातील ३७ हजार ५११ मुले आणि मुलींचा शोध घेऊन पालकांकडे सुपूर्द केली आहेत. अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले.