श्री गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे ऊर्फ दासगणू महाराज हे बाबांचे परमभक्त होते. त्यांना लावण्या रचण्याचा नाद होता. ते पोलीस खात्यात नोकरी करत होते. त्या वेळी १८९२ च्या सुमारास थोर साईभक्त नानासाहेब चांदोरकर यांच्याशी दासगणूंचा काही कामानिमित्त संबंध आला. नानासाहेब अहमदनगरला कलेक्टर चिटणीस म्हणून नोकरीला होते. चांदोरकरांबरोबर तेव्हा दासगणू प्रथमच शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला गेले आणि १८९६ नंतर मग त्यांचे शिर्डीशी आणि बाबांशी दृढ नाते जमले.
एकदा काय अद्भुत घडले; दासगणूंना पर्वकाळी प्रयागतीर्थी स्नान करण्यासाठी जावे अशी इच्छा उत्पन्न झाली; त्या वेळी ते शिर्डीत साईबाबांबरोबर मशिदीत बसले होते. दासगणंूची इच्छा ऐकताच बाबा म्हणाले, ‘अरे गणू, तुला गंगास्नान करायला दूर कशाला जायला हवे? इथेच तर आपलं प्रयागतीर्थ आहे, अरे माझ्यावर विश्वास ठेव!’ असे त्यांचे बोल ऐकताच दासगणूंनी साईबाबांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले आणि काय
आश्चर्य! बाबांच्या दोन्ही पायांच्या अंगठ्यांमधून गंगा-यमुनेचे पाणी पाझरू लागले. या बाबांच्या प्रेममय लीलेने दासगणू भारावून गेले आणि उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातून ‘अगाध शक्ती अघटित लीला’ हे काव्य स्फरले. दासगणूंच्या प्रितभेला गुरुकृपेचा आशीर्वाद लाभला. दासगणू महाराजांनी पोलीस खात्यातील नोकरी सोडून दिल्यानंतर साई महिमा वर्णन करणाऱ्या पदांमधून साईबाबांच्या शिकवणीचा प्रचार केला. ते उत्तम कीर्तनकार म्हणून प्रसिद्धीला आले. त्यांनी अनेक मौलिका, आधात्मिक ग्रंथ लिहिले. भक्तलीलामृत, संतकथामृत भक्तिसारामृत लिहिले.
विलास खानोलकर