मुंबई (प्रतिनिधी) : मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. सध्या तलावांत १३ लाख ८१ हजार ५० दशलक्ष लिटर (९५.४२ टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईला जवळजवळ ३५८ दिवस म्हणजेच पुढील ८ ऑगस्ट २०२३ पर्यंत पुरेल इतका आहे.
यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. जूनच्या शेवटी आणि जुलैच्या सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली आणि तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. दरम्यान मुंबईला पाणीपुरवठा करणारे सगळेच सात तलाव भरले असून काही तलाव ओव्हर फ्लो देखील झाले आहेत.
सध्या सर्व सात तलावांत मिळून एकूण १३ लाख ८१ हजार ५० दशलक्ष लिटर इतका म्हणजे पुढील ११ महिन्यांपेक्षाही जास्त कालावधीसाठी पुरेल इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. त्याशिवाय यंदा पावसाचा आणखी दीड महिना शिल्लक आहे. त्यामुळे तलाव क्षेत्रात आणखी चांगला पाऊस पडून काही दिवसांतच सर्वच तलाव भरून वाहू लागतील. परिणामी मुंबईकरांची पाणी चिंता मिटली आहे.