मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे पालिकेची चिंता वाढली आहे. त्यातच स्वाईन फ्लू आणि मलेरियाचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
साथीचे आजार पसरू नयेत यासाठी पालिका दरवर्षी पावसाळ्यात उपाययोजना करते. असे असतानाही साथीच्या आजारांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडते. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात हिवताप आणि स्वाइनफ्लूची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १३८, तर मलेरियाचे ४१२ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे ४६ आणि गॅस्ट्रोचे २३७ रुग्ण आढळले आहेत.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच स्वाइन फ्लू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ सुरू झाली होती. दुसऱ्या आठवड्यातही ही वाढ कायम आहे. काही भागांत हिवताप, स्वाईन फ्लू, डेंग्यू या आजारांच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो हे सगळेच आजार वाढत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे साथीच्या आजारांनीही डोके वर काढल्याने पालिकेच्या आरोग्य विभागासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.