देवगड (प्रतिनिधी) : रानभाज्या महोत्सवाने बचत गटांना प्रोत्साहन प्राप्त होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने असे महोत्सव झाले पाहिजेत. लोकप्रतिनिधी म्हणून याची आपण दखल घेऊन रानभाजी महोत्सवांना प्रोत्साहन मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले जातील. आता शेतकऱ्यांच्या हिताचे व त्यांचे हित जपणारे आपले सरकार या राज्यात आले आहे. दिवसेंदिवस रानभाज्यांचे महत्व पाहता त्याचे मार्केटींग होणे गरजेचे आहे. यातूनच उत्पन्नाचे साधन निर्माण होईल, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी येथे व्यक्त केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे रानभाज्या विक्री व खाद्य महोत्सव पार पडला. कृषी विभाग, कृषी तंत्र ज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पंचायत समिती- देवगड, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान- देवगड (उमेद) आणि देवगड- जामसंडे नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार राणे बोलत होते. यावेळी आत्माचे अध्यक्ष महेश पाटोळे, तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, प्रकाश राणे, योगेश पाटकर, संदीप साटम, अमोल तेली, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, ऋचाली पाटकर, मनीषा जामसंडेकर, स्वरा कावले, जि. प. च्या माजी सदस्या सावी लोके, विभागीय अध्यक्ष शैलेश लोके, भाजप शहर अध्यक्ष दयानंद पाटील, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, तन्वी शिंदे, मिलिंद माने आदी उपस्थित होते. आमदार राणे म्हणाले, बचत गटातील महिलांना ज्या समस्या भेडसावत आहेत, त्या समस्या त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात द्याव्यात. त्या समस्या सोडविण्यासाठी आपण शासनस्तरावर करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
रानभाज्यांचे आहारातील महत्व, त्यांचे आयुर्वेदिक औषधी गुणधर्म याची माहिती सर्व सामान्यांना मिळावी. तसेच रानभाज्याच्या पाककृतीची माहिती व्हावी, रानभाज्यांचा वापर वाढवावा, या उद्देशाने रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शेतकरी सल्लागार समितीचे (आत्मा) अध्यक्ष महेश पाटोळे यांनीही मार्गदर्शन केले.