Friday, April 25, 2025
Homeदेशसावरकरांच्या पोस्टर वादप्रकरणी चौघांना अटक

सावरकरांच्या पोस्टर वादप्रकरणी चौघांना अटक

शिवमोगा : कर्नाटकातील शिवमोगा येथे सोमवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यावरुन मोठा तणाव निर्माण झाला. या घटनेत एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. दरम्यान, चाकू हल्ला प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी आज (मंगळवार) चार जणांना अटक केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यास एका गटाने आक्षेप घेतला. त्या ठिकाणी टीपू सुलतान यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्याचा प्रयत्न या गटाने केला. त्यावरून दोन गटांत संघर्ष झाला होता. यावेळी गांधीनगर भागात एका युवकावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव प्रेमसिंह असे असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातील तणावपूर्व स्थिती पाहता प्रशासनाने तीन दिवसांसाठी शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत पोलिसांनी नदीम (२५), अब्दुल रहमान (२५) आणि जबीउल्लाह या चारपैकी तीन जणांची ओळख उघड केली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी नदीमचा २०१६ मध्ये शिवमोगा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या जातीय संघर्षात सहभाग होता, असे सांगितले.

कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी जखमी युवकाची भेट घेतली आहे. आरोपींवर तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासनही दिले आहे. शिवमोगातील हल्ला हा सावरकर फलकाच्या वादाशी संबधित असावा असे दिसते आहे. पण, अद्याप पूर्ण माहिती हाती आलेली नाही, अशी प्रतिक्रिया ज्ञानेंद्र यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -