मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून म्हणजेच बुधवार १७ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी ५ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे.
खातेवाटपानंतरची मंत्रीमंडळाची ही पहिलीच बैठक असेल. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सायंकाळी साडेपाच वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची दुपारी साडेतीन वाजता संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी विरोधी पक्षांचे प्रमुख नेतेही उपस्थित असतील.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. ते २५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये तीन दिवसांच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज हे सहा दिवसांचे असणार आहे. शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक २०, २१ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.