Saturday, April 26, 2025
Homeमहत्वाची बातमीमेटेंच्या निधनाबाबत धक्कादायक खुलाशाने गुढ वाढले

मेटेंच्या निधनाबाबत धक्कादायक खुलाशाने गुढ वाढले

मुंबई : शिवसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या गाडीचा अपघात झाला की घातपात याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. अशातच बीड येथील शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. मेटे यांच्या गाडीचा ३ ऑगस्टलादेखील घातपाताचा प्रयत्न झाला होता. बीडहून पुण्याकडे जात असताना शिक्रापूरजवळ दोन गाड्यांनी मेटेंच्या गाडीचा पाठलाग केला होता, असा खुलासा बीड येथील पदाधिकारी अण्णासाहेब माळकर यांनी केला आहे.

माळकर म्हणाले की, या गाडीने आमच्या गाडीला कट मारण्याचादेखील प्रयत्न केला होता. या घटनेवेळी आपण स्वतः त्यांच्यासोबत होता. आयशर गाडी आपला वारंवार पाठलाग करत असल्याचे आपण मेटेंना सांगितल्याचेही ते म्हणाले. त्यावेळी संबंधित गाडीचा चालक नशेत असेल त्यामुळे तो वारंवार पाठलाग करत असेल असे मेटे साहेब म्हणाले होते. त्यामुळे १४ तारखेला पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात देखील पाठलाग करणारी गाडी असेल तर, नक्कीच हा घातपातच असण्याची शक्यता असून, असे असल्यास आम्ही शांत बसणार नाही, असे माळकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, माळकर यांच्या धक्कादायक खुलाशानंतर विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी संपूर्ण घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच मेटे यांच्या गाडीचा तीन ऑगस्ट रोजी पाठलाग करणाऱ्या आणि घटनेवेळच्या गाडीचा तपास करण्यात यावा, अशी मागणी मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे.

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे मराठा समन्वय समितीच्या बैठकीसाठी बीडहून मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी त्यांच्या कारला खालापूर टोलनाका पास केल्यानंतर पहाटे अपघात झाला. त्यातच त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी निधन झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -