
मोखाडा : देशात स्वातंत्र्याचा ७५वा अमृत महोत्सव उत्साहात सुरु असताना मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्यात एका गर्भवती महिलेला वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिच्या जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा आदिवासी पाडे आणि दुर्गम भागातील मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी येथे ही हृदयद्रावक घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी येथील वंदना बुधर या गर्भवती महिलेला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी तीन किलोमीटर डोलीतून पायपीट करत दवाखाना गाठावा लागला. यावेळी वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने बुधर यांच्या जुळ्या बालकांचा मृत्यू झाला. अशा प्रकारची घटना घडल्याचा हा दुसरा प्रकार आहे. यापूर्वीदेखील रस्ता नसल्याने दोन-तीन महिलांना डोलीतून दवाखान्यात नेण्याची वेळ आली होती.
पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य या सारख्या प्राथमिक सुविधांचा स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही वानवा असल्याचे या घटनेनंतर पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. चांगले रस्ते आणि आरोग्य सेवा नसल्याने येथील नागरिकांना डोलीकरुन पायपीट करत दवाखाना गाठावा लागतो. त्यात वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागत आहे.