मृदुला घोडके
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये, संगीत आणि देशभक्तीपर गाण्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ब्रिटिश राजवटीला आव्हान देण्यासाठी, विविध भारतीय भाषांमध्ये अनेक गाणी लिहिण्यात आली. या गाण्यांमध्ये देशाचा गौरवशाली इतिहास, त्यावेळच्या जुलमी राजवटीचं वर्णन आणि देशाला बंधमुक्त करण्यासाठी जनतेनं सरसावून पुढे यावं आणि प्रयत्न करावेत असं आवाहन करण्यात आलेलं दिसतं. या सर्व प्रयत्नांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीचं बरंच मोठं योगदान आहे. बॉलिवूडच्या देशभक्तीपर गाण्यांद्वारे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदेश जनमानसांत पोहोचवण्यात आले आहेत. अशा गाण्यांनी त्या त्या काळात जनमत ढवळून काढलं आणि नवचैतन्यही निर्माण केलं. संगीत आणि राष्ट्रप्रेम यांचं अतुट नातं आजही अबाधित आहे. काळानुसार या दोन्हींचे संदर्भ, स्वरूप आणि संदेश बदलले असले तरी हे दोन्ही कालजयी ठरले आहेत.
राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याचा आणि समाजाच्या सर्व स्तरांत त्याकाळी बंधुभाव निर्माण करण्याकरिता, बंगाली कवी, बंकिमचंद्र चटर्जी यांनी १८ व्या शतकाच्या अखेरीस, आपल्या “आनंदमठ” कादंबरीमध्ये लिहिलेली ‘ वंदे मातरम् ‘ ही कविता थोड्याच अवधीत संपूर्ण राष्ट्रासाठी एक हाक ठरली. हे गीत आजही विविध स्वरूपात गायलं जात आहे. त्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेलं ‘जयोस्तुते’ हे गीतही ‘वंदे मातरम्’प्रमाणे, मातृभमीप्रती अत्युच्च समर्पण भावनेने ओतप्रोत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात, हिंदी चित्रपटातील अनेक देशभक्तीपर गाण्यांनी लोकांमध्ये देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित केली.
१९४०मध्ये आलेल्या ‘बंधन’ या चित्रपटातील “चल चल रे नौजवान” हे गाणं तेव्हाच्या पिढीला प्रेरणा देणारं तर होतंच शिवाय त्यावेळच्या राजकीय पक्ष सभांमध्ये ते आवर्जून गायलं जायचं. १९४२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किस्मत’ चित्रपटातील कवी प्रदीप यांनी लिहिलेल्या, “आज हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा हैं” या जोशपूर्ण गाण्यामुळे ब्रिटिशविरोधी आंदोलन आणखी प्रखर झालं. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर, आकाशवाणीच्या ‘आर्मी प्रोग्राम’ची हे गाणं सिग्नेचर ट्यून म्हणून प्रसिद्ध झाली.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४८ मध्ये आलेल्या ‘शहीद’ या चित्रपटात, दिलीपकुमारने एका स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारली होती. त्यामधील मोहम्मद रफी यांनी गायलेलं “वतन की राह में वतन के नौजवान शहीद हो” या गाण्यातून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागते हा संदेश मिळतो. याच काळात, स्वावलंबी होण्यासाठी भारताच्या नव्या संघर्षात, माणूस आणि यंत्र यांची सांगड घालण्याच्या विषयावर आधारित १९५७ साली आलेल्या “नया दौर” चित्रपटात, साहिर लुधियानवी यांनी लिहिलेलं, ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि पडद्यावर दिलीप कुमार यांनी साकार केलेलं “ये देश है वीर जवानोंका” हे गाणं ऐकताना आजही धमण्यांमधून गरम रक्त वाहत असल्याची जाणीव होते. परदेशात आपल्या मातृभूमीच्या व्याकुळ झालेल्या व्यक्तीची वेदना मांडणारं, प्रेमधवन यांनी शब्दबद्ध आणि सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं “ऐ मेरे प्यारे वतन” हे गाणं मन हेलावून टाकत. ही व्याकुळता पडद्यावर दाखवणारा बलराज साहनी आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो. १९६१ मध्ये आलेल्या ‘काबुलीवाला’ या चित्रपटातलं हे गाणं मन्ना डे यांनी एका टेकमध्ये गायलं होतं.
मातृभुमीच्या दर्शनासाठी मनाची तडफड आणि आर्तता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या “ने मजसी ने” या गाण्यातून आपल्या हृदयाला किती खोलवर भिडते हे मराठी जनास ठाऊक आहेच. १९६२ मध्ये भारत – चीन युद्धात पराभव पत्करावा लागल्यानंतर, देशाच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचं बलिदान आठवून अस्वस्थ झालेल्या कवी प्रदीप यांच्या लेखणीतून उतरलेल्या आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गंधर्व गळ्यातून उतरलेलं “ऐ मेरे प्यारे वतन” हे हेलावून टाकणारं गाणं, कुठल्याही चित्रपटात सामील केलेलं नसलं तरी ते अजूनही प्रचंड लोकप्रिय आहे. सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं हे कालजयी गाणं, लतादीदी यांनी सर्वप्रथम २७ जानेवारी १९६३ रोजी, दिल्लीच्या नॅशनल स्टेडियमवर, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समक्ष गायलं होतं. गाणं ऐकून, पंतप्रधान नेहरू यांचे डोळे पाणावले होते. या पराभवानं खचलेल्या भारताचं मनोधैर्य वाढवण्याचं महत्त्वाचं काम, या गाण्यानं केलं. “या गाण्यानं जो प्रेरित होणार नाही तो भारतीय नाही” असे उद्गार पंडित नेहरू यांनी त्यावेळी काढले होते. या गाण्यामुळे स्वातंत्र्याचं महत्त्व जाणवलं. १९६४ साली प्रदर्शित झालेल्या “लीडर” या चित्रपटात, शकील बदायुनी यांनी लिहिलेल्या, “अपनी आझादी को हम हरगीज मिटा सकते नही” या जोशपूर्ण गाण्यानं पुन्हा एकदा शहीद भगतसिंग यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आणि देशभक्तीच्या प्रखर भावनेची आठवण करून दिली.
त्यानंतर, १९६५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मनोजकुमार यांच्या “शहीद” चित्रपटातील “मेरा रंग दे बसंती चोला” या गाण्यामध्ये, देशासाठी हसत हसत फासावर चढणाऱ्या, महान स्वातंत्र्य सैनिक, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या निस्सीम त्यागाचं वर्णन, प्रेम धवन यांनी केलं असून आपल्या तिरंग्यातील त्यागाचं प्रतीक असलेल्या भगव्या रंगाची आठवण करून होऊन एक जोश निर्माण होतो.
हिंदी चित्रपटसृष्टीत भारत कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोजकुमार यांच्या १९६७ मध्ये आलेल्या
“उपकार” या चित्रपटातील, गुलशन बावरा यांचं, “मेरे देश की धरती” हे गाणं कायमच लोकप्रिय आहे. या गाण्यात आपल्या कृषी प्रधान भारताच्या समृद्धीचं वर्णन आहे. ‘जय जवान जय किसान’ या घोषणेवर आधारित अशा प्रकारच्या गाण्यासाठी, त्यावेळचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी विनंती केली होती असं सांगण्यात येतं.त्याआधी १९६४ सालच्या “हकिकत” चित्रपटातील
“कर चले हम फिदा, जान ओ तन साथीयों “हे गाणं तसंच १९७० मध्ये आलेल्या ‘प्रेम पुजारी’ या चित्रपटातील “ताकद वतन की हमसे हैं” या गाण्यांमधून जवानांची अतुट देशभक्ती, अखेरच्या श्वासापर्यंत शत्रूला नामशेष करण्याची जिद्द, कवी कैफी आझमी आणि नीरज यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून व्यक्त केली आहे.
८०, ९० आणि त्यानंतरच्या दशकामध्ये, नवीन वळण घेतलेल्या देशभक्तीपर गीतांनी, आपल्याला सरहद्दीवर, कशाचीही तमा न बाळगता मातृभूमीसाठी पहारा देत असलेल्या जवानांपर्यंत पोहोचवलं. त्यांच्या त्यागाची, खडतर जीवनाची आपल्याला आठवण करून दिली. १९७१च्या युद्धावर आधारित ‘बॉर्डर’ चित्रपटातील “संदेसे आते हैं” हे गाणं, जवानाच्या कर्तव्यनिष्ठ जीवनाचं चित्रं उभं
करणारं आहे.
‘रोजा’ चित्रपटातील “भारत हमको जानसे प्यारा है” हे गाणं असो, ‘चक दे इंडिया’मधील टायटल साँग असो किंवा ए आर रेहमान यांच्यासारख्या नव्या पिढीला आपल्या संगीताने खिळवून ठेवणाऱ्या हुकुमी संगीतकाराच्या आवाजातील “वंदे मातरम्”चं आधुनिक स्वरूप असो… ही गाणी, त्यांचे शब्द, संगीत हे सगळं, भारतीयांना हलवून टाकणारं आहे. ‘एअरलिफ्ट’ चित्रपटातील “तू भला जिसे” हे गाणं परदेशात वास्तव्य करणाऱ्या भारतीय नागरिकांचीही आपला देश चिंता करतो हे दाखवून देतं. आलिया भट हिचा अभिनय असलेल्या ‘राझी’ या चित्रपटातील “ऐ वतन, आबाद रहे तू” या गाण्यातून, परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांची, आपल्या देशाबद्दलची व्याकुळता व्यक्त करतं. ‘नीरजा’ चित्रपटातील “आंखे मिलायेंगे डर से” गाण्यातून भीतीच्या नजरेत नजर भिडवण्याची ताकद मिळते. ‘परदेस’मधील “आय लव माय इंडिया” आणि ‘स्वदेस’मधील “ये जो देश है तेरा” अशी गाणी भारताची वैभवशाली संस्कृती आणि परंपरा यांचं वर्णन करणारी आहेत, देशाभिमान जागृत करणारी आहेत. अलीकडेच २०१९ मध्ये आलेल्या “केसरी” या चित्रपटातील’ तेरी मिट्टी’ हे अतिशय आर्ततेने गायलेलं गाणं, आपल्या अंगावर सरर्कन काटा आणणारं आहे तर ‘उरी-सर्जिकल स्ट्राईक’मधील “छल्ला – मैं लड जाणा” या गाण्यातून मातृभूमीवर जीव ओवाळून टाकणारा जवान साकार होतो.
ही आणि अशीच अनेक देशभक्तीपर गाणी, देशाचा संघर्ष आणि त्यावर मात करून पुढे जात असलेल्या विजयी वाटचालीची जाणीव करून देतात. ही गाणी आपल्याला प्रोत्साहन देतात, मातृभूमीसाठी काही तरी करण्याकरिता उद्युक्त करतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेशी प्रामाणिक राहून राष्ट्र बांधणीच्या कार्याला हातभार लावू या. ७५ वर्षांपूर्वी हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून देणाऱ्या प्रत्येक देशभक्तांच्या त्यागाप्रती केवळ कृतज्ञता व्यक्त न करता कुठल्याही प्रकारे, आपणही देश सेवेत रुजू होण्याचा संकल्प करू या.
पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता…
चकमकीत दोन अतिरेकी ठार, १० किलो IED आणि शस्त्रसाठा जप्त बारामुल्ला : जम्मू काश्मीर येथे…
दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…
वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…