विरार (प्रतिनिधी) : ‘आपण धर्मग्रंथ आवडीने वाचतो. ही चांगली बाब आहे. काहींना धर्मग्रंथ वाचल्याशिवाय झोप लागत नाही. पण झोप उडविणारा भारताचा जाज्वल्य स्वातंत्र्य लढा प्रत्येक भारतीयाला माहित असणे आणि या लढ्याची माहिती पुढच्या पिढीला देणे गरजेचे आहे. आपण बेसावध राहिलो तर कधी आपल्या नकळत आडवळणाने देशात हुकूमशाही येईल आणि आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले जाईल ते आपल्यालाही समजणार नाही,’ अशी भीतीवजा अपेक्षा वसई मच्छिमार संस्थेचे संचालक मिल्टन सौदिया यांनी व्यक्त केली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवारी वसई मच्छिमार संस्थेच्या आवारात ध्वजवंदन झाले. ज्येष्ठ संचालक जॉनी नागो आणि नाझरेथ मनभाट यांच्या हस्ते अमृत महोत्सवी ध्वजारोहण झाले. ध्वजवंदनानंतर संचालक मिल्टन सौदिया यांनी स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास थोडक्यात सांगितला. १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांमधील स्वातंत्र्य लढ्यातील काही प्रेरणादायी घटनांचा थोडक्यात आढावा घेतला. ध्वजवंदन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सेक्रेटरी हेमंत जाधव यांनी केले. तर आभार प्रदर्शन चेअरमन संजय कोळी यांनी केले.
आयटीआयचे विद्यार्थी तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर जोरदार घोषणा दिल्या. ध्वजवंदनासाठी संस्थेच्या संचालकांसह आयटीआयचे विद्यार्थी, शिक्षक, मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी कोरे, त्यांचे सहकारी तसेच संस्थेच्या सभासद तथा मासळी विक्री करणाऱ्या महिला, टेम्पोचालक, रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.