Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमीडहाणूकरवाडी ते दहिसर अतिरिक्त मेट्रो सेवेचा प्रारंभ

डहाणूकरवाडी ते दहिसर अतिरिक्त मेट्रो सेवेचा प्रारंभ

मुंबई : मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच इंधन आणि प्रवाशांच्या वेळेची बचत होण्यासाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत मेट्रो हा उत्तम पर्याय आहे. मेट्रोबाबत लोकांच्या मनात विश्वास असून शून्य विलंब हे मेट्रो सेवेचे यश आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मेट्रो २ अ’ या मार्गावरील सुशोभिकरण केलेल्या मेट्रो डब्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे अनावरण करण्यात आले. डहाणूकरवाडी ते दहिसर (पूर्व) दरम्यानच्या अतिरिक्त मेट्रो सेवेलाही मुख्यमंत्र्यानी हिरवा झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी रवाना केले. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, एप्रिलमध्ये सुरु झालेल्या ‘मेट्रो २ अ’ या मार्गिकेवरुन ३८ लाख प्रवाशांनी सुखकरपणे प्रवास केला आहे. आजपर्यंत एकही गाडी विलंबाने धावली नाही किंवा मेट्रो रद्द झालेली नाही. आता मेट्रोची वारंवारिता वाढल्याने प्रवाशांचा सुखकर प्रवास होईल. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात मेट्रोची विविध कामे प्रगतीपथावर असून मेट्रोचा एक – एक टप्पा पुढे जातो आहे. त्यामुळे मेट्रोद्वारे प्रवाशांचा आरामदायी, सुखकर प्रवास व्हावा, यासाठी मेट्रोने अधिक दर्जेदार गुणवत्तापूर्ण सेवा देण्याबरोबरच आगामी प्रकल्पही वेळेआधी पूर्ण करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -