विरार : विरारमध्ये एकाच कुटुंबातील पाच लहान मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. यात आठ वर्षीय मुलीचा आणि नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिघांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विरार पूर्व टोकरे ग्रामपंचायत टोकरे पाडा येथे घडली आहे. विरार पूर्व येथील टोकरे ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या भोयपाडा येथे अश्फाक खान आणि रजियाबानू खान हे आपल्या पाच मुलांसह राहतात. शुक्रवारी राञी साडेनउच्या सुमारास हे सर्व कुटुंब जेवल्यानंतर झोपले. माञ शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक मुलांची तब्येत बिघडली.
यातील नऊ वर्षाचा मुलगा आसिफ खान आणि आठ वर्षाची मुलगी फरीफ खान यांना पहाटे चारच्या सुमारास उलटी आणि पोटात दुखू लागल्याने विरारच्या भाताणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखले केले होते. त्यानंतर दहा वर्षांची मुलगी फराना खान, चार वर्षाचा मुलगा आरीफ खान आणि तीन वर्षाचा मुलगा साहिल खान यांना तुळींजच्या पालिका रुग्णालयात दाखल केले. माञ यातील आसिफ आणि फरीफ या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या मांडवी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.