जालना : राज्यात सर्वाधिक लोखंडी गज उत्पादित करणाऱ्या जालना येथील स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरं, कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली. विभागाने केलेल्या या छाप्यांमध्ये सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे. त्यात ५८ कोटींची रोकड, ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा १६ कोटींचा ऐवज तसेच सुमारे ३०० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्त्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आला आहे. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यात औरंगाबादमधील एका प्रख्यात बिल्डर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे.
विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी पथकाला तब्बल १३ तास लागले. १ ते ८ ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील २६० अधिकाऱ्यांसह कर्मचारी १२० हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात पोहोचले होते. जालन्यात मिळालेली ही रोकड स्थानिक स्टेट बँकेत नेऊन मोजण्यात आली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली मोजणी रात्री १ वाजता पूर्ण झाली.
आयकर विभागाने या व्यापाऱ्यांची घरे, कार्यालयांतून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनी, शेती, बंगले यांसह बँकांतील ठेवी, इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली. एकूण सुमारे ३०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचा दावा पथकाने केला आहे.
जालन्यात स्टील कंपन्यांवर फिल्मी स्टाईल छापा
आयकर विभागाने जालन्यामध्ये छापेमारीसाठी जाताना आयकर विभागाच्या गाड्यांवर दुल्हन हम ले जायेंगे असा आशय असल्याचे स्टीकर गाड्यांवर लावण्यात आले होते. आयकर विभागाने एसआरजे पीटी स्टील्स प्रा. लि. आणि कालिका स्टील अलॉयज प्रा. लिमिटेड कंपन्यांवर छापे टाकले आणि कोट्यावधींची संपत्ती जप्त केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी प्राप्तिकर विभागाची १०० हून अधिक वाहने जालन्यात दाखल झाली. या वाहनांवर विवाह सोहळ्याचे स्टिकर्स होते. या वाहनांवर ‘राहुल वेड्स अंजली’चे स्टिकर्स लावण्यात आलेले होते. शेकडोच्या संख्येने आलेल्या या वाहनांमध्ये ४०० हून अधिक आयकर अधिकारी आणि कर्मचारी होते. वाहनांचा एवढा मोठा ताफा पाहून जालनावासीयांना सुरुवातीला काहीच समजले नाही. ही वाहने कुठल्यातरी लग्न समारंभासाठी आली असावीत असे त्यांना वाटले. काही वेळाने शेकडो वाहनांतून आलेले लोक हे आयटी अधिकारी असून हे पाहुणे लग्नसमारंभासाठी आलेले नसून छापा टाकण्यासाठी आले असल्याचे समजले.
आयकर विभागातर्फे करण्यात आलेल्या या कारवाईत सुरुवातील अधिकाऱ्यांना काही आढळून आले नाही. मात्र, त्यानंतर अधिकाऱ्यांना कारवाईचा मोर्चा शहराबाहेरील आठ ते दहा किलोमीटरवरील फार्महाऊसकडे मोर्चा वळवला. त्यावेळी तेथे कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली.