इतिहासकालापासून आजतागायत जगात ज्या ज्या समस्या निर्मांण झालेल्या आहेत. त्याचे एकमेव कारण परमेश्वराबद्दलचे अज्ञान हे होय. माणसाला परमेश्वराबद्दलचे ज्ञान होईल तेव्हा सर्वच समस्या नाही होतील असे मी म्हणणार नाही. पण ९५ टक्के समस्या या निश्चित सुटू शकतील. ५ टक्के समस्या या इतरांमुळे निर्माण होतात. एखादा माणूस बसस्टॉपला उभा आहे. एखाद्या ट्रकचालकाचा ताबा सुटला व तो ट्रक सरळ बसस्टॉपवर घुसला व त्यात या माणसाचा जीव गेला. तो माणूस जगातून गेला त्यात या माणसाचा काय दोष होता? ५ टक्के समस्या या इतरांमुळे व ९५ टक्के समस्या या आपल्यामुळे निर्माण होतात. ह्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी परमेश्वराबद्दलचे ज्ञान होणे आवयक आहे पण परमेश्वराबद्दलचे अज्ञान इतके प्रचंड आहे की देवाच्या भक्तीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली आज सर्व ठिकाणी अनेक अनिष्ट गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. देवाधर्माच्या नावाखाली दंगेधोपे, दहशतवाद, भांडणतंटे होतात. माणसे एकाच धर्माची असली तरी भांडणे करतात. पाच भाऊ हिंदू आहेत तरी भांडतात. पाच मुसलमान एकमेकांचे भाऊ आहेत तरी भांडतात. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एकाच धर्माचे लोक असले तरी ते सुखी होतीलच असे नाही. तो कुठल्याही धर्माचा असू दे पण त्याला देव म्हणजे काय हे माहीत नाही, धर्म म्हणजे काय हे माहीत नाही तर त्याला सुखी करण्याचे सामर्थ्य कुणातही नाही. जगांत कुणीच सुखी नाही। “जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधूनी पाहे”. आज जगांत कोण सुखी आहे? श्रीमंत माणूस तोही दुःखी, गरीब हे गरिबीमुळे दुःखी. सत्ताधीशाला काही कमी आहे का तरीही त्यांना दुःख आहेच ते का? आपण पुन्हा निवडून येवू का? निवडून आल्यावर मंत्रीपद मिळेल का? आणि मिळाले तरी ते टिकेल का? विद्वान असला तरी तो ही दुःखी असतोच. याचे कारण शोधून काढत नाहीत. हेच जीवनविद्येने शोधून काढले ते म्हणजे परमेश्वराबद्दलचे अज्ञान. परमेश्वराबद्दलचे ज्ञान होईल तेव्हा जगातल्या समस्या दूर होतील. एक शहाणा आहे पण बाकीचे वेडे असतील तर कसे होणार? घरात दहा माणसे आहेत. त्यात एकच शहाणा व बाकीचे वेडे असतील तर वेडयांची संख्या जास्त असल्यामुळे हा शहाणा त्यांना सुखी करू शकत नाही. जेव्हा माणसे शहाणी होतील तेव्हाच ती सुखी होतील. माझा एक सिध्दांत आहे, माणसाकडे शहाणपण येईल तेव्हा तो सुखी होईल. मी “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” या ग्रंथात लिहून ठेवलेले आहे की शहाणपण हाच धर्माचा आत्मा आहे.
– सदगुरू वामनराव पै