Thursday, November 14, 2024
Homeमहत्वाची बातमीकर्जत सायकलपटूंची श्रीनगर ते लेह-लडाख मोहीम फत्ते

कर्जत सायकलपटूंची श्रीनगर ते लेह-लडाख मोहीम फत्ते

कर्जत सायकल प्रेमी, रक्षा सामाजिक विकास मंडळाच्या सायकलपटूंची कामगिरी

कर्जत/अलिबाग (वार्ताहर) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कर्जत सायकल प्रेमी व रक्षा सामाजिक विकास मंडळ या संस्थांतर्फे श्रीनगर ते लेह-लडाख अशी अतिउंचीवरील सायकल मोहीम पूर्ण केली. या सायकल मोहिमेद्वारे “सायकल चालवा पर्यावरण वाचवा” हा संदेश देण्यात आला. काही सदस्यांनी मोहिमेच्या मार्गातील शाळांमधील विद्यार्थ्यांना “आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा” याचे प्रशिक्षण दिले.

रक्षा सामाजिक विकास मंडळ ही संस्था, गेली ६ वर्षे आपत्ती व्यवस्थापन या विषयावर विविध क्षेत्रांमध्ये जनजागृती करीत आहे. या वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीनगर ते लेह लडाख अशा अतिउंचीवरील प्रदेशात ४४५ किलोमीटर सायकल चालवून ही मोहीम पूर्ण केली. या मोहिमेचा त्यांचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ वरून होता. या मार्गात येणाऱ्या शाळांमध्ये मोहिमेतील सदस्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण व सुरक्षा यावर मार्गदर्शन केले.

या सायकल मोहिमेत अतिउंचीवरील विरळ हवामानात १० हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर जेथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते, असे जोझिला पास ११ हजार ५५७ फूट, नमीकला पास १२ हजार १३९ फूट, फोटूला पास १३ हजार ४७९ फूट हे ३ पॉईंट्स पाऊस पडत असताना बोचऱ्या थंडीत व काही वेळेस रणरणत्या उन्हात ३७ अंश डिग्री सेल्सिअस तापमान असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पार केले.

या मोहिमेत ७ सायकलस्वार सहभागी झाले होते व मदतनीस म्हणून ३ सदस्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. सायकलस्वारांमध्ये सायकल मोहिमेचे पथकप्रमुख प्रकाश पटवर्धन, श्रीराम फाटक, हितेन राणे, किशोर साळवी, अमित मोने, श्रीरंग जोशी व अमित गुरव सहभागी झाले होते. मदतनीस व छायाचित्रकार म्हणून विशाल गायकवाड, भावेश ठक्कर व गौरव फाटक यांनी काम पाहिले. त्याचबरोबर लेह येथील जगातील सर्वात उंच रस्ता म्हणजेच खारदुंगला पास १८ हजार ३८० फूट या ठिकाणी सायकल मोहिमेतील श्रीरंग जोशी व किशोर साळवी हे सायकलस्वार अतिशय खडतर वातावरणात येथे सायकलवरून पोहोचण्यात यशस्वी झाले व त्यांनी तेथे तिरंगा फडकवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -