नाशिक : येवला तालुक्यातील चिंचोडी रायते परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी टोमॅटो पिकाची लागवड करत असतात. परंतू यंदा टोमॅटोवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतक-यांना अडचणींचे ठरत आहे.
टोमॅटोकडे प्रचंड कष्टाचे आणि खर्चिक पीक म्हणून पाहिले जाते. गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यात टोमॅटोचे रेट ६० ते ७० रुपये जाळी दराने ह्या मातीमोल भावात विकल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आले होते. केलेला खर्चही निघाला नव्हता. परंतु जानेवारीत क्षेत्र घटल्याने टोमॅटो परत ५०० ते ७०० प्रती कॅरेट विकल्याने आणि हा दर मे महिन्यापर्यत टिकून राहिल्याने शेतक-यांनी मे-जूनमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केली, परंतु सततच्या पावसामुळे टोमॅटोवर करपा, अळी रोगामुळे उपाययोजनांवर शेतक-यांचा मोठा खर्च होत आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाला आहे.
तसेच शेतक-यांना टोमॅटो रोपे बांधणी करण्यासाठी मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे. महागड्या औषधाची फवारणी करून शेतकरी आपआपले टोमॅटो क्षेत्र वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या पिकासाठी एकरी लाख ते दीड लाख रुपये खर्च येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, गेल्या वर्षी नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी यंदा टप्प्या-टप्प्याने लागवड केली असल्याचे चिंचोडी परिसरात पहावयास मिळत आहे.