Thursday, April 24, 2025

आनंददूत

माधवी घारपुरे

फूल जर नीट फुलायला हवे, तर त्याला वेळच्या वेळी खतपाणी घालायला हवे. झाड अंगोपांगी नीट वाढले, तर टपोऱ्या कळ्या झाडाला येतील. कीड लागू देऊ नये. तसेच कळी मुद्दाम फुलवायलाही जाऊ नये.

जे फुलांबाबत तेच मुलांबाबत. पाच बोटांची मूठ बनते. मुले, पालक, शिक्षक, समाज आणि शासन. एका बोटाने तर मूठ घट्ट आवळली जाईल. त्यांना आत्मविश्वास येईल.

मुलांची मनं कोवळी असतात. शिक्षकाने संवेदनशील असले पाहिजे, ही सर्वात प्रथम गोष्ट. इयत्ता सातवी ब चा वर्ग. सुमेध सहावीला सहा तुकड्यांतून पहिला आलेला मुलगा. आपल्या वर्गात पहिला आलेला मुलगा आहे ना? कोण तो!
सुमेध उभा राहिला. बाई म्हणाल्या, “तू होय! बस खाली”

ही संवेदनशीलता म्हणायची का? त्याला पुढे बोलवायचं, त्याचं कौतुक करायचं, यंदाही आपल्या वर्गाचं नाव मोठं कर सांगायचं! त्याचा आत्मविश्वास वाढला असता. त्या बाईंबद्दल प्रेम वाटलं असतं.

सांगायचा मुद्दा काय की, छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना प्रेरणा द्यायची. सगळीच मुले बोलत नाहीत. ती कृतीतून व्यक्त होतात. त्याचं एक उदाहरण.

एके दिवशी पाचवीच्या वर्गावर ऑफ तासाला मला तिथे जायचं होतं. चित्रकला, पीटी हे तास मुलांचे आवडीचे. ते तास बुडाले की मुलं नाराज होतात. मला पाहून तसंच वाटणार म्हणून मी वर्गात जातानाच चित्रकलेच्या कागदांचा गठ्ठा वर्गात घेऊन गेले. मुले खूश झाली. मला चित्रकलेत गती नाही. मी कागद वाटले आणि मुलांना सांगितले, “मुलांनो या अर्ध्या तासात तुमच्या मनात जे काही येईल ते चित्र काढा. मी तुमच्या सरांना ती दाखवीन.”

मुलं खूश झाली. अर्धा तास गुंगून गेली. मी बेंचेसमधून फेऱ्या मारत होते. कुणी डोंगर, कुणी ढग, कुणी हत्ती काढले होते. मुलांच्या भावना चित्रातून व्यक्त होतात. एका चित्रावर माझी नजर थबकली. मी विचारले, “तुझे नाव काय?” “हरि” तो म्हणाला.

हरि हे काय काढलंय? त्याने झटकन उत्तर दिले, “मॅडम, ही तिरडी! चांगली नाही आली?” “ओळखली आहे, पण सगळं सोडून तिरडीच का काढली?”

“त्याचं काय ना बाई माझा बाबा रोज दारू पिऊन येतो आणि आईला मारतो, तिला म्हणतो, नाही तिरडीवर पोहोचवली तर बघ. मग मला खूप राग येतो पण मी काय करणार? म्हणून मी तिरडी काढली. बाबालाच त्याच्यावर झोपवणार.” उत्तर ऐकलं आणि मी चपापले. बापरे! काय विचार! केवढासा मुलगा, पण याच्या मनात केवढी चीड भरलीय? पण साठलेली वाफ बाहेर पडायला चित्र उपयोगी ठरलं. याच्या वडिलांना भेटून काही उपयोग होईल का? पण याबाबत काहीतरी करू हे नक्की! क्षणात हे बदललं जाणार नाही.

क्षणात एक गोष्ट मात्र मला करता आली. ती मी केली. छायानं तिला येईल तशी डिश काढली आणि त्यात केक काढला. छान रंगवला आणि त्याच्यावर काळी रेघ काढली. मी म्हटलं, “छाया, केक काढून काळी रेघ का मारली?”

“बाई, माझ्या घरी ना, आई दोन्ही भावांना वाढदिवसाला केक आणते. पण माझा नाही आणत.” तेवढ्यात तास संपल्याची बेल झाली. मी मुलींना विचारलं, तर त्या म्हणाल्या “बाई, तिची आई सावत्र आहे. तिला घरी पण खूप काम करून यावं लागतं.”

मी प्रगतिपुस्तक काढलं. तिसऱ्या दिवशीच तिचा वाढदिवस होता. हेडमास्टरना विचारूनच केक आणला. त्या दिवशी शाळा सुरू झाल्यावर तिला कल्पना नसताना वर्गात केक आणून तिला कापायला लावला. सगळा वर्ग ओरडला, “हॅप्पी बर्थ डे छाया” क्षणात वर्गाचं नंदनवन झालं. तिच्या आईलाही बोलावलं होतं. थोडा केक डब्यातून तिच्या घरच्यांना दिला. आईचा चेहरा शरमला होता.

मला सांगा, छोट्या छोट्या गोष्टीतून आपण असे मुलांचे ‘आनंददूत’ होऊ शकतो ना!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -