अनघा निकम-मगदूम
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आता साजरा होत आहे. ब्रिटिशांच्या दीडशे वर्षाच्या जुलमी राजवटीत अनेक वर्ष त्यांना झुंज देत हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी, थोर महापुरुषांनी, विचारवंतांनी भारत देशाला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त केलं आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. त्यालाही आता ७५ वर्षे पूर्ण झालीत. स्वातंत्र्य संग्रामाचा काळ अनुभवणारी पिढीसुद्धा आता हळूहळू कमी होत आहे, जवळपास संपली आहे. मात्र असं असलं तरीसुद्धा भारतीय स्वातंत्र्याची ऊर्मी, देशाभिमान आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात तसाच जिवंत आहे, नव्हे स्वातंत्र्य दिनी, प्रजसात्तक दिनी तो दिसतोच. भारत माझा देश आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये स्फूरण चढवणारी आहे.
या सगळ्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासामध्ये जेव्हा संपूर्ण देश लढत होता, तेव्हा या देशातील देवभूमी समजल्या जाणाऱ्या कोकणभूमीतूनसुद्धा हजारो भूमिपुत्रांनी या भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे. यातील अनेकांची शासकीय नोंद आहे, तर अनेकांच्या समाधीजवळ पणतीही नाही, अशी स्थिती आहे. इथले अनेक स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत सहभागी झाले होते. अनेकांनी महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहामध्ये भाग घेतला. स्वातंत्र्यासाठी कारावास भोगला आहे. अनेक थोर विचारवंतांनी या देशाला नवे विचार दिले आहेत. नवी प्रेरणा दिली आहे. कारावास भोगला होता, शिक्षा भोगली होती, असे अनेकजण या कोकण भूमीमध्ये स्वातंत्र्यसैनिक म्हणून होऊन गेले. अनेकांची नावं काळाच्या पडद्याच्या गेलीसुद्धा; परंतु इथल्या प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अमूल्य आहे.
इथे ही स्फूर्ती, नवचेतना असण्याचं कारण कोकणची ही भूमी संघर्षाची, लढवय्यांची, योद्ध्यांची भूमी आहे. १८५७च्या या स्वातंत्र्यसंग्रामाने भारतीय स्वातंत्र्याचा अग्नी चेतवला. त्यातील अग्रणी असलेली झाशीची राणी लक्ष्मीबाई ही कोकणातली. तिचं माहेर आणि सासर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातलं. म्हणजेच स्वातंत्र्याची बीजं आहेत, ऊर्मी आहे, ती ऊर्मी या भूमीच्या कणाकणामध्ये भरली आहे. तिच ऊर्मी घेऊन इथली मनू राणी बनून झाशीमध्ये गेली होती आणि तिने शेवटच्या श्वासापर्यंत भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. तिथूनच स्वातंत्र्याची ज्योत हिंदुस्थानामध्ये पेटवली गेली. याच भूमीमध्ये असंतोषाचे जनक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं आणि स्वातंत्र्यलढ्यातील आधुनिक राष्ट्रपुरुष म्हणून जे गौरवण्यात आले आहेत, ते लोकमान्य टिळक थोर राष्ट्रपुरुष आहेत. त्यांचे प्रखर विचार, त्यांच्या विचारातील ज्वलंतपणा याच कोकणभूमीतील आहेत. लोकमान्यांच्या याच विचारांनी स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अमूल्य आहे. त्यांनी तर रत्नागिरीला आपली कर्मभूमी करून घेतली होती. त्यांचे आधुनिक स्वातंत्र्याचे विचार, त्याची बिजेसुद्धा त्यांनी याच कोकणभूमीमध्ये रुजवली आहेत. समाजातील अस्पृश्यतेची भिंती मोडून समानतेचा वारसा निर्माण करणारे पतितपावान याचं भूमीत दिमाखात उभे आहे.
हा बदल कोकणी भूमीने स्वीकारला आहे. सावरकर यांनी इंग्रजांची दिलेला लढा, सहन केलेले अत्याचार आणि त्यातून पुन्हा ऊर्मीने उभे राहिलेले सावरकर या कोकणभूमीने पाहिले आहेत. त्यांचा लढा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आणि सुदैव इथल्या कोकणपुत्रांना मिळाले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशवासीयांना कसं जगलं पाहिजे ते शिकवलं. कायद्याच्या चौकटीतून देशाला बांधलं, प्रत्येकाला त्याचा हक्क देतानाच देशाप्रती कर्तव्याची जाणीव करून दिली, जगभरात नावाजलेली लोकशाही व्यवस्था दिली, ते डॉ. बाबासाहेब मंडणगड तालुक्यातील अंबडवे गावातले! अशी कोकणातून अनेक थोरा-मोठ्यांची नावे घेतली जातील, त्यांनी या देशाला घडवलं आहे. या अमृतमहोत्सवी वर्षातले त्यांचे स्मरण तितक्याच आदराने केलं पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करताना नवकल्पना देशवासीयांना दिली आहे. भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक, आपला अभिमान असलेला आपला तिरंगा घराघरांवर तितक्याच डौलानं फडकू दे, त्याचे वैभव प्रत्येक घरामध्ये दिसू दे. यासाठीच ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवण्यात येणार आहे.