अॅड. रिया करंजकर
आपले दिवसभराचे काम आवरून, ठाण्यातील पोलीस आपल्या डुट्या पूर्ण करून घरी जाण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात पोलीस ठाण्यातील फोन खणखणू लागला म्हणून घरी जाणाऱ्या पोलीस शिपायाने तो फोन उचलला. तेव्हा समोरच्या खबऱ्याने माहिती दिली की, सब-वेमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा खून झालेला आहे, हे ऐकल्यावर पोलीस ठाणे हादरून निघाले. कारण संध्याकाळच्या वेळी असा खून होणे आणि तेही सब-वेमध्ये म्हणजे काहीतरी भयानक घडलेले असणार म्हणून ड्युटीवरून जाणारे व ड्युटी जॉइन करणारे दोन्ही पोलीस हादरून गेले. सायरनचा आवाज करत पोलिसांच्या गाड्या सब-वेच्या दिशेने निघाल्या.
पोलीस खून झाला त्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांनी बारीक-सारीक गोष्टींचे निरीक्षण केल्यावर असं लक्षात आलं की, ज्याचा खून झालेला आहे तो एक डिलिव्हरी बॉय होता. त्या ठिकाणी त्याची बाईक पडलेली होती. त्याच्या कपड्यावरून तो बाजूच्या फेमस रेस्टॉरंटमधला डिलिव्हरी बॉय होता, हे पोलिसांना कळलं. पोलिसांनी डेड बॉडी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी हॉस्पिटलला पाठवले आणि अर्धी टीम त्या जवळच्या रेस्टॉरंटमध्ये दाखल झाली. प्राथमिक चौकशी केल्यावर पोलिसांना अशी माहिती हातात लागली की, खून झालेला डिलिव्हरी बॉय हा तिथे अनेक वर्षं काम करत असून आलोक असं त्याचं नाव होतं आणि तो तीन तासांपूर्वी डिलिव्हरी देण्यासाठी रेस्टॉरंटमधून निघाला होता. रेस्टॉरंटचा मालक त्याला कधीपासून फोन करत होता. पण त्याचा फोन स्वीच ऑफ येत होता. मालकाला वाटलं, फोनला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. आलोक येईल म्हणून आलोक आला नाही या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. कारण आलोक विश्वासू नोकर होता. पोलिसांनी आलोक ज्या रेस्टॉरंटमध्ये काम करत होता तिथल्या इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करायला सुरुवात केली. त्या चौकशीमध्ये आलोक अतिशय प्रामाणिक कोणाशी वैर, भांडणतंटा नसलेला असा मुलगा होता, हे पोलिसांना समजलं. मग आलोकचा खून केला कुणी? हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर आ वासून उभा राहिला.
तोपर्यंत पोलिसांनी आलोकच्या घरचा पत्ता घेऊन आलोकबाबत झालेली घटना त्याच्या घरी कळवण्यासाठी शिपायाला पाठवले. शिपायाने आलोकबद्दल झालेली माहिती घरी न सांगता आलोकच्या आईला पोलीस स्टेशनला घेऊन आला. आपल्याला पोलीस स्टेशनला का बोलावलं?, हा प्रश्न आलोकच्या आईला पडला. पोलिसांनी आईला विचारलं, “आलोक कुठे आहे?”, तर आईने “तो कामावर आहे. तो येईल, कारण तो डिलिव्हरी बॉय आहे. त्यामुळे घरी येण्याचा टाइम फिक्स नाही”, असे पोलिसांना सांगितले. आपल्या मुलाबद्दल प्रश्न का विचारतात?, हाही प्रश्न त्या आईला पडला आणि तिने “अलोक ठीक आहे ना, अलोकने काय केलं नाही ना, माझा मुलगा काही करणार नाही, तो साधा सरळ मुलगा आहे”, असं ती पोलिसांना विणवू लागली. “माझ्या मुलाने काय केलं असेल, तर त्याला सोडून द्या हो. तो माझा एकुलता एक मुलगा आहे. माझ्या विधवेचा तो आधार आहे. त्याने काय केलं असेल, तर मी तुमची माफी मागते”, असं ती पोलिसांना विनवू लागली. पोलिसांनाही प्रश्न पडला की, या आईला कसं सांगायचं की तुमचा आलोक या जगामध्ये नाही. पोलीस स्टाफमधल्या एका जाणकार पोलीस शिपायाने “तुमचा आलोक या जगात नाही”, असं आलोकच्या आईला सांगितलं. आलोकची आई तिथल्या तिथे स्तब्ध झाली. तिच्या तोंडातून कुठलाही शब्द बाहेर येईना म्हणून पोलीस शिपायाने तिला हलवून पुन्हा “तुमचा आलोक या जगात नाही”, असं सांगितलं असता त्या माऊलीने जी आर्त किंकाळी फोडली. ती किंकाळी पोलीस ठाणे दणाणून निघाली ती आर्त किंकाळी तिच्या हृदयातून आणि पोटच्या गोळ्यासाठी निघाली होती. त्या आर्त किंकाळीने पूर्ण पोलीस स्टेशन जागच्या जागी स्तब्ध झाले.
आलोक हा शांताचा एकुलता एक मुलगा. तो लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि शांताने आपल्या मुलासाठी काबाडकष्ट करून त्याला मोठं केलं. आलोकलाही आपल्या आईच्या कष्टाची जाणीव होती म्हणून तो कॉलेज करून रेस्टॉरंटमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करत होता आणि घरखर्चाला आणि आपल्या आईला हातभार लावत होता. सर्वात मिळून मिसळून वागणारा आलोक. आईचा म्हातारपणाचा आधार होता आणि आज अचानक तो आपल्या आईला या जगात एकटं सोडून दूर निघून गेला होता. आपला मुलगा या जगात नाही, या गोष्टीवर त्या आईचा विश्वासच बसत नव्हता.
पोलिसांनी आपलं तपासकार्य जलद गतीने सुरू केलं. ज्या सब-वेमध्ये आलोकचा खून झाला होता. त्या सब-वेचा वापर लोक जास्त करत नव्हती, कारण त्या ठिकाणी चोरीमारी होत असे म्हणून त्या मार्गाने कोणी जात नव्हतं. आलोक त्या दिवशी डिलिव्हरी करायला गेला आणि या मार्गाने आपण लवकर डिलिव्हरी करू, असं त्याला वाटलं असणार आणि म्हणून त्यांने या सब-वेची निवड केली असणार. याची खात्री पोलिसांना पटली कारण, त्याची डेड बॉडी जेव्हा सापडली त्यावेळी त्याचा मोबाइल, पर्स त्याच्या गळ्यातली चैन या वस्तू तिथे नव्हत्या. पण पोलिसांना हे कळत नव्हतं की नेमकं या गोष्टीसाठी त्याचा खून झालाय की कुठल्या दुश्मनीमधून खून झालाय? हे कळायला मार्ग नव्हता. मग पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला आणि पोलिसांमधलाच शिपाई दुपारच्या वेळी तिथून जाण्यासाठी तयार केला. तोपर्यंत आलोकचा खून होऊन पंधरा दिवस होत आलेले होते. शिपाई साध्या वेशामध्ये त्या सब-वेमधून निघाला. तेवढा तिथे दबा धरून बसलेला गर्दुल्ला त्यांच्यासमोर आला व चाकू दाखवून शिपायाकडील वस्तू घेण्याचा प्रयत्न केला तेवढाच आजूबाजूला पाळत ठेवून असलेल्या पोलिसांनी त्या गर्दुल्ल्याला आपल्या ताब्यात घेतलं. त्या गर्दुल्ल्याला पोलीस स्टेशनमध्ये आणले असता पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यावर तो भडाभडा बोलू लागला. “मला पैशांची गरज होती म्हणून त्या दिवशी त्या डिलिव्हरी बॉयला मी अडवलं व पैशाची मागणी केली. पण त्याने मला पैसे देण्यास नकार दिला म्हणून मी रागाच्या भरात त्याचा खून केला”, असं त्याने पोलिसांना सांगितलं. नशेसाठी, नशेला लागणाऱ्या पैशासाठी एका आईचा मुलगा मात्र या नशेने हिरावून घेतला.
(सत्य घटनेवर आधारित)