अमरावती : नुपूर शर्मांना समर्थन केल्याप्रकरणी उदयपूर येथे एका व्यक्तीची हत्या केल्यानंतर महाराष्ट्रातील अमरावती येथेही उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करत असून आरोपींनी कोल्हेंची हत्या केल्यानंतर हॉटेलात जाऊन बिर्याणी पार्टी केल्याचे चौकशीत समोर आले आहे.
नव्याने अटक केलेल्या मौलवी मुसीफ अहमद आणि अब्दुल अरबाज यांना विशेष न्यायलयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी उमेश कोल्हे यांची हत्या केल्यानंतर बिर्याणी पार्टी केली असल्याचे सांगितले. त्यानंतर एनआयएने आपला तपासाचा वेग वाढवला असून त्यामध्ये आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेल्यानंतर शाहरूख पठान (२५), शेख इरफान, मुदस्सिर अहमद (२२), अब्दुल तौफिक (२४), शोएब खान (२२), अतिब रशीद (२२) व यूसुफ खान बहादूर खान (४४) या ६ आरोपींना एनआयएने अटक केली होती. त्यानंतर मौलवी मुसीफ अहमद आणि अब्दुल अरबाज या दोघांना एनआयएने अटक केली होती. या हल्ल्यातील मास्टरमाइंड असलेल्या इरफान शेख याला लपवण्यास आणि पळवून जाण्यास मदत केल्याचा आरोप या दोघांवर असून विशेष न्यायालयात त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, ५४ वर्षीय उमेश कोल्हे यांच्यावर २१ जून रोजी रात्री १०-१०.३०च्या सुमारास अमरावती येथे तीन हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला होता. गंभीर अवस्थेत त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्याप्रकरणी त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे.