नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीला हवाला व्यवहाराचे पुरावे सापडले आहेत. यंग इंडिया परिसराची झडती पूर्ण केल्यानंतर ईडी नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठी कारवाई करू शकते. याशिवाय सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या वक्तव्यांची फेरतपासणी केली जाणार आहे, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. बुधवारी मोठी कारवाई करीत ईडीच्या अधिकाऱ्यांनी यंग इंडिया लिमिटेडचे नॅशनल हेराल्ड कार्यालय सील केले होते.
तपास एजन्सीला तृतीय पक्ष आणि नॅशनल हेराल्डशी संबंधित संस्थांमधील हवाला व्यवहाराचे पुरावे मिळाले आहेत, असे ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. तपासादरम्यान तपास एजन्सीने यंग इंडिया लिमिटेडच्या कार्यालयातून कागदोपत्री पुरावे जप्त केले. जे मुंबई आणि कोलकाता येथील हवाला ऑपरेटर्ससोबत हवाला व्यवहार दर्शवतात, असेही सूत्राने सांगितले.
तपास यंत्रणा राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्या वक्तव्यांची पुन्हा तपासणी करीत असल्याचेही ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. एजेएल आणि यंग इंडियन बाबतचे सर्व आर्थिक निर्णय मोतीलाल व्होरा यांनी घेतल्याच्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या दाव्याशी ईडी सहमत नाही. तसेच ईडी सोनिया आणि राहुल गांधी यांच्या स्पष्टीकरणाशी सहमत नाही की, त्यांना यंग इंडियनकडून त्यांच्या कलम २५ कंपन्यांची ॲक्ट फर्म म्हणून आर्थिक लाभ मिळाला नाही.