Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

उदय सामंत यांच्या कारवर हल्ला; 'शिवसंवाद' सभेच्या आयोजकांसह ५ अटकेत

उदय सामंत यांच्या कारवर हल्ला; 'शिवसंवाद' सभेच्या आयोजकांसह ५ अटकेत

पुणे : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रात्रभर भारती विद्यापीठ पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड केली असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या 'शिवसंवाद' सभेच्या आयोजकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.


शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची कात्रजमध्ये 'शिवसंवाद' यात्रा आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पुणे दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शनासाठी येणार होते. त्यांच्या आधीच उदय सामंत हे मंदिरात जात असताना काही जणांच्या जमावाने उदय सामंत यांच्या कारवर हल्ला केला. यावेळी गद्दार.. गद्दारच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात सामंत यांच्या कारची काच फुटली. या हल्ला प्रकरणी मुख्य आयोजक संभाजी थोरवे, राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार यांना अटक करण्यात आली आहे. तर, पंधरा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या घटनेनंतर गाडीवर दगड मारुन पळून जाणे ही मर्दुमगी नाही. कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याचे काम सरकारचे आणि पोलिसांचे आहे. त्यामुळे ज्यांनी हे केले आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम पोलीस करतील असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले.

Comments
Add Comment