मुंबई : सोशल मीडियामुळे तब्बल २० वर्षापुर्वी बेपत्ता झालेल्या एका महिलेला शोधण्यात यश आले आहे. दुबईला गेलेली ही महिला चक्क पाकिस्तानात सापडल्याने या प्रकरणाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.
२० वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुंबईतील ७० वर्षीय हमीदा बानो पाकिस्तानात सापडल्या आणि विशेष म्हणजे हे शक्य झाले ते केवळ सोशल मीडियामुळे. २००२ मध्ये दुबईत घरकाम करण्यासाठी त्या शहर सोडून गेल्या होत्या. २० वर्षांपूर्वी एका एजंटने दुबईमध्ये कामाचे आश्वासन देऊन बानो यांची फसवणूक केली होती. त्यानंतर त्या दुबईऐवजी चक्क पाकिस्तानमध्ये पोहोचल्या होत्या.
हमीदा बानो यांच्याकडे भारतात माघारी येण्याचा मार्ग नव्हता. त्यामुळे त्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हैदराबाद येथे राहू लागल्या. तेथे त्यांनी एका व्यक्तीशी लग्नही केले. त्यांना एक मुलही आहे. मात्र कालांतराने त्यांच्या पतीचे निधन झाले. हे सर्व प्रकरण उघडकीस आले वलीउल्लाह मारूफ या पाकिस्तानमधील एका कार्यकर्त्यामुळे.
मारूफने बानो यांचा व्हिडिओ बनवून त्याच्या YouTube चॅनेलवर अपलोड केला आणि त्यामुळे बानो यांच्या कु़टूंबाला त्यांचा पत्ता लागला. बानो यांच्या मुलीने भारत सरकारला मदतीचे आवाहन केले आहे. ती म्हणते, “माझी आई सुरक्षित आहे, याचा आम्हाला आनंद आहे. तिला परत आणण्यासाठी सरकारने आम्हाला मदत करावी”
सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू असून या प्रकरणावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर अनेक फायदे होतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.