वॉशिंग्टन : अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी याला अमेरिकेने अफगाणिस्तानात ड्रोन हल्ल्यात ठार केले आहे. २०११ मध्ये ओसामा बिन लादेनच्या हत्येनंतर दहशतवादी संघटना अल-कायदासाठी हा दुसरा सर्वात मोठा धक्का आहे. अमेरिकी प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले की, जवाहिरी अनेक वर्षांपासून लपून बसला होता आणि त्याला शोधून मारण्याची कारवाई दहशतवादविरोधी आणि गुप्तचर यंत्रणेने अत्यंत सावधपणे पार पाडली, ज्याचे परिणाम आज समोर आले आहेत. ही संपूर्ण कारवाई कशी पार पडली याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने दिली आहे. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त प्रकाशित केले आहे.
अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक वर्षांपासून अमेरिकेला जवाहिरीच्या नेटवर्कबद्दल माहिती मिळत होती आणि एजन्सी त्यावर लक्ष ठेवून होती. अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर येथे अल कायदाचे अस्तित्व वाढण्याची चिन्हे होती. त्याच वर्षी, अमेरिकन अधिकार्यांना असे आढळून आले की, जवाहिरीचे कुटुंब, त्यांची पत्नी, त्याची मुलगी आणि तिची मुले काबूलमधील एका सुरक्षित घरात राहत आहेत. यानंतर याचा बारकाईने अभ्यास करण्यात आला त्यावेळी या घरामध्ये जवाहिरीचे वास्तव्य असल्याची खात्री पटली.
याबाबतची माहिती वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्याचे काम एप्रिलच्या सुरुवातीला सुरू झाले होते. यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना याबाबत माहिती दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी त्या घराची पाहणी केली आणि तेथे किती लोक राहतात आणि घराची रचना कशी आहे याची माहिती घेतली. इतरांना कमीत कमी हानी पोहोचवून ऑपरेशन कसे केले जाऊ शकते याचाही शोध घेण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
त्यानंतर राष्ट्राअध्यक्षांनी प्रमुख सल्लागार आणि मंत्रिमंडळ सदस्यांसह ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी बैठका बोलावल्या. १ जुलै रोजी, बायडेन यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी व्हाईट हाऊस सिच्युएशन रूममध्ये प्रस्तावित ऑपरेशनबद्दल माहिती दिली, ज्यात CIA संचालक विल्यम बर्न्स यांचा समावेश होता. बायडेन यांनी त्याबद्दल आम्हाला तपशीलवार प्रश्न विचारले आणि गुप्तचर यंत्रणेने तयार केलेल्या आणि बैठकीत आणलेल्या सुरक्षित घराच्या मॉडेलचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. ज्यात प्रकाश, हवामान, बांधकाम साहित्य आणि ऑपरेशनच्या यशस्वीतेवर परिणाम करू शकणार्या इतर घटकांचा सखोल चर्चा करण्यात आली होती.
२५ जुलै रोजी बायडेन यांनी त्यांच्या प्रमुख मंत्रिमंडळ सदस्यांना आणि सल्लागारांना अंतिम ब्रीफिंग घेण्यासाठी आणि जवाहिरीच्या हत्येचा तालिबानशी अमेरिकेच्या संबंधांवर कसा परिणाम होईल यावर चर्चा करण्यासाठी बोलावले होते. या सर्व बाबींवर सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर बायडेन यांनी या ऑपरेशनला करण्याला अंतिम मंजुरी दिली. त्यानंतर रविवारी रात्री काबूलमध्ये क्षेपणास्त्रांसह ड्रोन हल्ला करण्यात आला. यावेळी अफगाणिस्तानात एकही अमेरिकन अधिकारी उपस्थित नव्हता.