नवी दिल्ली : भारतात ५जी च्या दूरसंचार सेवा या वर्षी ऑक्टोबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. सरकारने रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी डेटा नेटवर्कसह चार कंपन्यांकडून १.५० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा स्पेक्ट्रम लिलाव पूर्ण केला आहे. ५जी स्पेक्ट्रमची बोली संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, ऑफर केलेल्या एकूण ७२,०९८ MHz स्पेक्ट्रमपैकी ५१,२३६ MHz (सुमारे ७१ टक्के) लिलाव करण्यात आला आहे.
गेल्या सात दिवसांत बोलीच्या एकूण ४० फेऱ्या झाल्या. बोलीचे एकूण मूल्य १,५०,१७३ कोटी रुपये आहे.
वैष्णव यांनी सांगितले की, १० ऑगस्टपर्यंत चांगली बोली लावणाऱ्यांना स्पेक्ट्रमचे वाटप केले जाईल आणि ५जी सेवा देशात या वर्षी ऑक्टोबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
“लिलाव पूर्ण झाला आहे आणि येत्या काही दिवसांत, १० ऑगस्टपर्यंत, मान्यता आणि स्पेक्ट्रम वाटपासह सर्व औपचारिकता पूर्ण केल्या जातील,” असे ते म्हणाले. “असे दिसते की आम्ही ऑक्टोबरपर्यंत देशात ५जी लाँच करू शकू. सध्या सुरू असलेला ५जी स्पेक्ट्रम लिलाव हे सूचित करतो की, देशाच्या दूरसंचार उद्योगाने ५जी च्या विकासात खूप मोठा पल्ला गाठला आहे,” स्पेक्ट्रमच्या चांगल्या उपलब्धतेमुळे देशातील दूरसंचार सेवांचा दर्जा सुधारेल असेही पुढे वैष्णव म्हणाले.
५जी स्पेक्ट्रम लिलावात सरकारला मिळालेल्या एकूण १,५०,१७३ कोटी रुपयांपैकी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने ५८.६५ टक्के म्हणजेच ८८,०७८ कोटी रुपयांची बोली लावली आहे.
जर ७०० MHz बँड वापरला असेल तर फक्त एक टॉवर लक्षणीय क्षेत्र व्यापू शकतो. दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेलने १९,८६७ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम ४३,०८४ कोटी रुपयांना विकत घेतला आहे. व्होडाफोन आयडियाने १८,७८४ कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, एकूण १,५०,१७३ कोटी रुपयांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. सरकार ७२,०९८ मेगाहर्ट्झपैकी १० बँडमध्ये ५१,२३६ मेगाहर्ट्झ किंवा ७१ टक्के स्पेक्ट्रमची विक्री करू शकले आहे. पुढे ते म्हणाले की, सरकारला पहिल्या वर्षी स्पेक्ट्रममध्ये १३,३६५ कोटी रुपये मिळतील. ऑक्टोबरपर्यंत ५जी सेवा सुरू करता येईल.