सिंधुदुर्ग (हिं.स.) : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२१-२२ अंतर्गत परुळेबाजार ग्रामपंचायतने जिल्हास्तरावर प्रथम तर निरवडे ग्रामपंचायतने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायती विभागस्तरीय मूल्यमापनसाठी पात्र ठरल्या आहेत. तर तृतीय क्रमांक खांबाळे ग्रामपंचायतने मिळविला आहे. हा निकाल मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी जाहीर केला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२१-२२ अंतर्गत जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली होती.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२१-२२ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राबविण्यात आले होते. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छ वार्ड जाहिर करुन १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात देय आहे. या ग्रामपंचायती मधुन तालुकास्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत तपासणी करुन जिल्हा परिषद प्रभागातील एका ग्रामपंचायतीची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता करण्यात आली होती. तालुकास्तरावर जिल्हा परिषद प्रभागात असणा-या स्वच्छ ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२१-२२ अंतर्गत ५० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
तालुकास्तरावरुन जिल्हा परिषद प्रभागनिहाय आलेल्या ५० ग्रामपंचायतीची जिल्हास्तरिय समितीने तपासणी मध्ये वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतने प्रथम क्रमांकाची पाच लाख रुपयांची रक्कम मिळविली आहे. व्दितिय क्रमांक सावंतवाडी तालुक्यातील निरवडे ग्रामपंचायतने व्दितीय क्रमांक मिळविला आहे. ही ग्रामपंचायत ३ लाख रुपये बक्षीसाला पात्र ठरली आहे तर वैभववाडी तालुक्यातील खांबाळे ग्रामपंचायतने तृतीय क्रमांक मिळवत दोन लाख रुपयांचे बक्षीस मिळविले आहे.
त्याचप्रमाणे संतगाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत देण्यात येणारा स्व. वसंतराव नाईक पुरस्कार कुडाळ तालुक्यातील तुळसुली कर्याद नारुर ग्रामपंचायतला, शौचालय व्यवस्थापनसाठी देण्यात येणारा स्व. आबासाहेब खेडेकर पुरस्कार कणकवली तालुक्यातील असलदे ग्रामपंचायतला तर पाणी गुणवत्ता व्यवस्थापन अंतर्गत देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड ग्रामपंचायतला जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी या तिन्ही ग्रामपंचायतला प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी सांगितले.