विरार (प्रतिनिधी) : प्रत्यक्ष खरेदीवेळीच टीकेच्या धनी झालेल्या वसई-विरार महापालिकेच्या घनकचरा विभागातील दोन स्वीपिंग मशीन पालिकेसाठी ‘नाकापेक्षा मोती जड’ ठरू नये, अशी अपेक्षा वसई-विरारकरांनी व्यक्त केली आहे. या मशीनच्या द्वितीय देखभाल-दुरुस्तीवर पालिकेला तब्बल १३ लाख ७० हजार रुपये खर्च करावे लागले आहेत.
राष्ट्रीय हवा शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत वसई-विरार महापालिकेने मागील वर्षी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून मे. रुट्स मल्टीक्लीन मुंबई यांच्याकडून दोन स्वीपिंग मशीन खरेदी केल्या होत्या. वाढत्या शहरीकरणामुळे दिवसागणिक रस्त्यांच्या संख्येत होणारी वाढ व त्यामुळे भविष्यात रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा होणारा वापर, ही बाब खर्चीक असल्याने या कामांच्या खर्चावर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वीपिंग मशीनचा पर्याय स्वीकारण्यात आला होता.
ही वाहने अत्याधुनिक गोष्टीनी स्वयंपूर्ण असल्याने या मशिनद्वारे महापालिका क्षेत्रातील रस्ते, फूटपाथ तसेच डिवायडरलगत असलेला कचरा व धुळीचे योग्य प्रकारे संकलन होऊन त्यावर स्प्रिंकलरद्वारे पाणी फवारणी होते. यामुळे वायुप्रदूषणही कमी होते. परदेशातील रस्त्यांची स्थिती लक्षात घेता, ही वाहने त्या ठिकाणी उपयोगी असली तरी वसई-विरार क्षेत्रात ती किती उपयोगी पडतील? असा प्रश्न त्या वेळी वसई-विरारकरांनी केला होता. या अनावश्यक खरेदीकरता तत्कालीन आयुक्त गंगाधरन डी. यांच्यावर प्रचंड टीकाही झाली होती.
त्यापेक्षा वसई-विरार शहरातील रस्ते सुधारण्यावर व प्रशस्त करण्यावर भर द्यावा, असा कान सल्लाही नागरिकांनी तत्कालीन आयुक्त गंगाथरन डी. यांना दिला होता. वसई-विरार शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेता ही दोन्ही वाहने विरार पश्चिम येथील म्हाडा वसाहत परिसरात कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या कार्यक्षमतेबाबतही नागरिकांना प्रश्न पडलेले आहेत. या वाहनांद्वारे या परिसरातील रस्ते साफ करण्यात येत असले तरी त्याद्वारे निर्माण होणारी धूळ बाजूलाच जाऊन बसते. ती उचलण्याची तसदी पालिकेकडून घेण्यात येत नाही. त्यामुळे पालिकेच्या वायुप्रदूषण मुक्ती उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
विशेष म्हणजे सद्यस्थितीत ही वाहने विरार पश्चिम येथील परिसरात कार्यरत आहेत; त्या ठिकाणी अजून तरी लोकवस्ती वाढलेली नाही. त्यामुळे रस्ते प्रशस्त व स्वच्छ आहेत. पण भविष्यात या ठिकाणी लोकवस्ती व रस्त्यांवरील वर्दळ वाढल्यास ही वाहने निष्काम ठरतील, असे निरीक्षणही नागरिकांनी नोंदवले आहे. दरम्यान; ही वाहने आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त तास चालली असल्याने मे. रुट्स मल्टीक्लीन मुंबई या कंपनीने या वाहनांची देखभाल-दुरुस्ती सुचवलेली होती. त्यानुसार वसई-विरार महापालिकेने या वाहनांच्या तीन महिन्यांचा देखभाल-दुरुस्तीचा खर्च १३ लाख ७० हजार रुपये अपेक्षित धरला आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिकेने खरेदी केलेल्या या मशीनवरील खर्च पाहता ‘नाकापेक्षा मोती जड ठरू नये,’ अशी अपेक्षा वसई-विरारकरांनी व्यक्त केली आहे.