खेड (प्रतिनिधी) : कोकणात गणेशोत्सवासाठी पुण्या-मुंबईहून जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. कोकणात जाताना महामार्गांवरील विविध टोल नाक्यांवर त्यामुळे आता टोल द्यावा लागणार नाही, पण यासाठी स्थानिक प्रशासनाकडून परवाना असणारे स्टीकर घ्यावे लागणार आहेत. सुमारे दहा हजारांहून अधिक वाहनांना टोल सवलतीचा फायदा होईल. यासाठी स्थानिक प्रशासनाकडून परवाना असणारे स्टीकर घ्यावे लागणार आहेत.
पुणे व कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना जाताना व गणेश विसर्जनानंतर परतणाऱ्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही सवलत एस.टी. बसेसनाही लागू होण्याची शक्यता आहे. २०१८ पासून मुंबई-पुणे द्रूतगती मार्ग तसेच कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने महामार्गावरील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.
कोकणात जाणाऱ्या वाहनांना ‘गणेशोत्सव-कोकण दर्शन’ या नावाचे स्टीकर उपलब्ध करून देण्यात आले होते. यावर्षीही अशी सवलत लागू केल्याची घोषणा करण्यात आली असून, यासाठी स्थानिक पोलीस ठाणे आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडे वाहनांची नोंदणी करून स्टीकर घ्यावे लागणार आहे.
पुण्याहून चिपळूणकडे जाणारी वाहने कराडपासून पाटणमार्गे, रत्नागिरी, राजापूरला जाणारी वाहने किणी वाठार वारणामार्गे आंबा घाटातून, देवगड, कणकवलीस जाणारी वाहने कोल्हापूर, गगनबावडामार्गे करूळ घाटातून, तर कुडाळ, मालवण सावंतवाडी, गोव्यास व कर्नाटकात जाणारी वाहने आजरा, आंबोलीमार्गे जात होती. या काळात किणी (जि. कोल्हापूर) व तासवडे (जि. सातारा) टोल नाक्यांवरून सुमारे दहा हजारांहून अधिक वाहने मार्गस्थ होण्याची शक्यता आहे.