Sunday, April 27, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यबिस्किटांमध्ये दडलंय तरी काय...

बिस्किटांमध्ये दडलंय तरी काय…

वृषाली आठल्ये

चहा आणि कपाचं नातं जेव्हढं घट्ट आहे तेव्हढंच चहा आणि बििस्कटांचे आहे. चहा आणि बिस्किटं खाताना स्वर्गीय आनंद मिळतो. कदाचित म्हणूनच चहाला पृथ्वीवरचं अमृत म्हणत असावेत. बाजारात अनेक प्रकारची बिस्किटं मिळतात. पण सर्व बिस्किटांचा सामान गुणधर्म म्हणजे त्यांचा कुरकुरीतपणा. बिस्किटांचे प्रकार म्हणावेत तर असंख्य. गोडी, खारीपासून काजू/बदामयुक्त, जिरेयुक्त अशी कितीतरी, मोजायला हातांचीच नाही तर पायाचीही बोटं कमी पडवीत, अशी परिस्थिती. बिस्कीट बनवणाऱ्या उत्पादक कंपन्याही असंख्य. ही बिस्किटे इतकी लोकप्रिय का? ती इतकी कुरकुरीत कशी काय? किंवा त्यातील घटक पदार्थ कोणते? असा विचार मनात आला आणि त्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी मी ग्राहक व्यवहार मंत्रालयाची बेवसाइट ओपन केली. या बेवसाइटवर केवळ बिस्किटेच नाहीत तर इतर अनेक उत्पादनांची इत्थंभूत माहिती आणि तज्ज्ञ व्यक्तींकडून केलेल्या परीक्षणांची तुलनात्मक माहितीही आकडेवारीसह उपलब्ध केलेली असते. मला जी माहिती मिळाली ती पुढीलप्रमाणे आहे.

सर्वसाधारणपणे बिस्किटे किंवा नानकटाई पाच प्रकारात विभागली जातात. गोड, कमी गोड, कुरकुरीत, नानकटाई आणि वैशिष्ट्यपूर्ण बिस्किटे असे प्रकार आहेत. भारतात घरगुती आणि पारंपरिक पद्धतीने बनविण्यात येणाऱ्या बिस्किटांचे ५०० पेक्षा जास्त प्रकार उपलब्ध आहेत. यात साधी खारी, साधी गोड, नारळाच्या फ्लेव्हरची तर काही सुक्या मेव्याचा जसे काजू, बदाम, पिस्ता आणि शेंगदाण्यापासून तयार केलेली बिस्किटे आहेत. भारतात बटर बाइट हा प्रकार सर्वात जास्त लोकप्रिय आहे.

हल्ली स्वतःच्या आरोग्याची काळजी असणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा लोकांसाठी डायजेस्टिव्ह बिस्किटे उपलब्ध आहेत. यात मैद्याऐवजी गव्हाचा आटा किंवा मल्टी ग्रेन पीठ वापरण्यात येते. त्यामुळेच फायबरचे प्रमाण जास्त असते. कन्झुमर व्हॉइस या संस्थेने भारतातील नामांकित कंपन्यांच्या डायजेस्टिव्ह बिस्किटांचे नमुने घेऊन त्यांचे रासायनिक पृथ:करण केले व त्याचा तुलनात्मक अहवाल या वेबसाइटर अपलोड केला आहे. या संस्थेने प्रिया गोल्ड, पतंजली, युनिबिक, ब्रिटानिया, अनमोल, ड्युक्स, पार्ले, क्रेमिका आणि मॅक व्हाइट या कंपन्यांचे नमुने या अभ्यासासाठी वापरले. हे पृथ:करण एकूण डायजेस्टिव्ह फायबर, ऊर्जा, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, अॅसिड इनसोल्युबल अॅश आणि दमटपणा अशा विविध स्तरावर करण्यात आले तसेच त्यांच्या किमतीची तुलना करण्यात आली. याशिवाय बिस्किटांमधील स्निग्धांश, त्यातील फॅटी अॅसिडचे प्रमाण, टान्स फॅटी आम्ल, कोलेस्टोरॉल इत्यादी अन्न घटक व त्यांचे प्रमाण तपासले.

या तुलनात्मक चाचणीचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे…

एकंदरीत चाचण्यांनुसार ‘प्रिया गोल्ड’ने सर्वात चांगले निकाल दिले. त्याचप्रमाणे किमतीच्या बाबतीतही इतर ब्रँडसना मागे टाकले. सेन्सरी पॅनल चाचणीत ‘अनमोल’ हा सर्वात आवडला जाणारा ब्रँड ठरला, तर त्यापाठोपाठ ‘प्रिया गोल्ड’ आणि ‘क्रेमिकाने’ कामगिरी केली. ‘पतंजली’मध्ये डाएटरी फायबरचे प्रमाण सर्वाधिक (७.१ टक्के) आणि ‘प्रिया गोल्ड’मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे (६.६ टक्के) आढळले. इथे महत्त्वाची बाब म्हणजे ‘पतंजली’ने १२.४८ टक्क्यांचा दावा केला होता. ‘क्रेमिका’मध्ये सर्वात कमी म्हणजे केवळ ४.३ टक्के फायबर आढळले.

प्रोटीनचे प्रमाण प्रिया गोल्डमध्ये सर्वाधिक (८.६ टक्के), तर क्रेमिकामध्ये सर्वात कमी (७.० टक्के) आढळले. बहुतांश कंपन्यांनी पाम तेलाचा वापर केला. स्निग्धांशामध्ये ‘ड्युक्स’ आणि ‘युनिबिक’ यांनी अग्रस्थान पटकावले. ड्युक्समध्ये सर्वात जास्त (४९९.९ कॅलरी) एनर्जी व्हॅल्यू, तर ‘अनमोल’मध्ये सर्वात कमी (४५८.६ कॅलरी) आहे. असे असले तरी अनमोलमध्ये सर्वाधिक कार्बोहायड्रेटस आहेत, तर ‘युनिबिक’मध्ये हेच प्रमाण सर्वात कमी आहे.

साखरेच्या प्रमाणातही अनमोल (२२.५ टक्के) आघाडीवर आहे, तर ब्रिटानियामध्ये हे प्रमाण सर्वात कमी (१७.० टक्के) आढळले. वयोवृद्ध आणि मधुमेही रुग्णांनी साखर कमी प्रमाणात खाणे केव्हाही चांगले आहे. या सर्व चाचण्या भारतीय मानक आयएस – १०११ आणि ‘एफएसएसएआय’च्या मापदंडानुसार करण्यात आल्या आहेत. या सर्व वस्तू आणि सेवांबद्दलची माहिती https://consumeraffairs.nic.in/en/consumer-corner/comparative-test-of-consumer-products-and-services या बेबसाइटवर उपलब्ध आहे. या सर्व माहितीचा उपयोग करून ग्राहकांनी कोणती, किती बिस्किटे खावी हे ठरवावे. प्रत्येक ग्राहकाने जाहिरातींना न भुलता या बेवसाइटचा नक्की अभ्यास करावा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -