Monday, January 13, 2025
Homeअध्यात्मप्रपंच केल्याशिवाय परमार्थ साधत नाही

प्रपंच केल्याशिवाय परमार्थ साधत नाही

प. पु. सद्गुरू समर्थ राऊळ महाराजांविषयी पावलो-पावली अनुभव आले आहेत. आणि अजूनही येत आहेत व पुढेही येतच राहतील. संत हे देहरूपाने गेले तरी ते सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात व प्रत्येकाची जशी भावना असेल तशी प्रत्येकाला प्रचिती येतच असते.

राऊळ महाराज हे संतपुरुष होते व त्यांची समाधी आज पिंगुळी गावांमध्ये आहे; परंतु संतपुरुष म्हणजे काय? हे समजण्याचे ज्ञानही त्यावेळी मला नव्हते. म्हणजे अगदी लहान वयात जवळजवळ ८ ते १० वर्षांची असतानाच मला प्रथम बाबांचे दर्शन माझ्या माहेरच्या गावी म्हणजे वालावलला लक्ष्मीनारायण-मंदिरामध्ये झाले; परंतु त्यांची उंच-भारदस्त शरीरयष्टी पाहून व त्यांनी धारण केलेला रूद्रावतार पाहून तर मी त्यांना घाबरून नमस्कार वगैरे न करताच घरी निघून गेली आणि त्यानंतरच बालमनामध्ये त्यांच्याविषयी भीती निर्माण झाली. पुढे ते आमच्या घरीही येऊ लागले; परंतु मी घाबरून दूर लपून राहायची. अशीच तीन-चार वर्षे निघून गेली असतील. एकदा मी व माझी मैत्रीण देवी माऊलीची ओटी भरण्यासाठी मंदिरामध्ये गेलो होतो. आमच्या मागोमाग महाराजांची स्वारी गाडीतून उतरली आणि थेट देवीच्या देवळात आली. त्यांना पाहताच मी दाराआड लपले. महाराजांनी माझ्या मैत्रिणीला मला घेऊन येण्यास सांगितले. मी घाबरतच बाबांच्या समोर येऊन उभी राहिली व घाबरतच महाराजांना नमस्कार केला. बाबांनी मला आपल्या हातांतील कैऱ्या दिल्या व सांगितले की,

‘आवशीक ह्या तोरांचा लोणचा करूक सांग,’ आणि विचारलं ‘काय गो माका भियातासं कित्यांक, मी काय वाघोबा आसय’ मी चक्क होऊन त्यांच्याकडे पाहातच राहिले. किती प्रेमळपणे ते माझ्याशी बोलत होते आणि बोलता बोलता त्यांनी मला हृदयाशी धरलं, मी त्या दिवसापासून त्यांच्या चरणी लिन झाले. माझ्या मनीची भीती कुठे गेली कळलंही नाही. आयुष्याला एक नवीन दिशा लाभली. त्यानंतरचा प्रत्येक क्षण बाबांच्या नाम स्मरणांत जाऊ लागला. महाराजांना भेटण्यासाठी मी पिंगुळीला येऊ लागली. तो आनंद काय वेगळाच होता. वडील माझ्या लहानपणीच वारले. त्यानंतर महाराज आमच्या घरी आले की, नेहमी मला म्हणायचे, रतन तू भिऊ नको. तू माझा चेडू आसस आणि मी तुझो बापुस आसय, मी तुझा लगीन करतलंय; परंतु मी बाबांना सांगायची की बाबा मी तुमच्याबरोबर फिरणार. तुमची सेवा करणार, मला लग्न वगैरे काही करायचे नाही; परंतु स्मित हसून गोड बोलून बाबा मला समजावित असतं. प्रपंच केल्याशिवाय परमार्थ साधत नाही आणि कळत-नकळत महाराजांनी माझ्याकडुन वचनही घेतले होते की मी सांगेन त्या मुलाशी लग्न करशील ना ? मी म्हटल बाबा मी तुमच्या आज्ञेबाहेर नाही व महाराजांनी स्वत: श्री.प्रमोद तेंडोलकरशी माझे लग्न ठरविले.

क्रमश:समर्थ राउळ महाराज

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -