दिलीप देशपांडे
श्रावण महिन्यात निसर्गाने आपले रूप बदललेले असते. श्रावण सरी कोसळतात, पाऊसही क्षणात येतो, क्षणात जातो. सर्वदूर हिरवे गवताचे गालिचे पसरलेले असतात. म्हणूनच कवितेत वर्णन केले आहे…
श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सर सर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे…
श्रावण हा सणांचा राजा मानला जातो. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगवेगळे आहे. वातावरण भक्तिमय झालेले असते. भक्तीचा सुगंध दरवळत असतो. श्रावणाच्या सुरुवातीला जीवतीचा कागद देवघराजवळ चिकटवून दर शुक्रवारी त्याचे पूजन, आरती करायची जुनी परंपरा आपल्याकडे आहे. आपल्या अपत्यांचं रक्षण व्हावं ही त्या मागील भावना आहे. श्रावणात शिवपूजनालाही खूप महत्त्व आहे. शक्य होईल तसे जोतिर्लिंगाचे दर्शन घेतात. त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, भीमाशंकर या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. अनेक ठिकाणी, मंदिरात किंवा घरी, रुद्रपाठ करतात. श्रावणी सोमवार, मंगळागौर, जिवतीची पूजा, नृसिंह पूजन, जन्माष्टमी (गोकुळाष्टमी) राखी पौर्णिमा, नारळीपौर्णिमा, बैल पोळा, याप्रमाणे श्रावणातील सण-उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.
नवविवाहित स्त्रियांनी श्रावणातील प्रत्येक मंगळवारी करावयाचे सौभाग्यदायी मंगळागौरी या देवतेचे एक व्रत. या व्रतात शिव आणि गणपतीसह गौरीची पूजा करतात. लग्नानंतर पहिली पाच वर्षे किंवा सात वर्षे हे व्रत पाळल्यानंतर या व्रताचे उद्यापन करतात. सुवासिनी स्त्री श्रावणातल्या मंगळवारी आपल्या विवाहित मैत्रिणींसह शिवासमवेत असलेल्या गौरीची पूजा करतात. पहिल्या वर्षी माहेरी हे व्रत करण्याची प्रथा आहे. विवाहित मैत्रिणी एकत्र जमून मंगळागौर रात्रभर जागवितात. निरनिराळे खेळ, गाणी, उखाणे इत्यादींनी मजेत दिवस व रात्र घालवितात व दुसरे दिवशी पहाटे पूजा-आरती करून सांगता करतात. हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांकरिता आहे. ‘जय जय मंगळगौरी’ म्हणून सोळा वातींची मंगल आरती भक्तिभावाने करतात आणि नंतर हातात तांदूळ घेऊन बसतात व मंगळागौरीची कहाणी ऐकतात. ती कहाणी तात्पर्याने अशी : सुशीला नावाच्या एका साध्वीस मंगळागौरी प्रसन्न झाली व पुढे तिला वैधव्य प्राप्त झाले असताना मंगळागौरीने यमदूतांशी युद्ध करून तिच्या पतीचे प्राण परत आणले आणि तिला अखंड सौभाग्यवती केले. मंगळागौरीच्या भक्तिपूर्वक केलेल्या पूजेचे हे फल होय. ही कहाणी ऐकल्यावर सुवासिनी हातातील तांदूळ देवीला वाहतात. दुपारी मौन आचरून भोजन करतात. पाच अथवा सात व्रते केल्यावर उद्यापन करतात. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली.
एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला, अशीही समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाहीत, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे. श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात. अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या आठ नागांची या दिवशी पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करताना महिला या दिवशी महिला घराची स्वच्छता करतात. जमिनी शेणाने सारवितात. अंगणात रांगोळी काढतात. नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्याची पूजा करतात. काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुळाची पूजा करतात. भारताच्या काही प्रांतात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा होते. दूध – लाह्य ह्या माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जातात, पण ते त्यांचे अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.
पुणे – बेंगलोर महामार्गावर कोल्हापूरकडे जाताना, पेठ नाका (इस्लामपूर)पासून उजव्या बाजूला एक फाटा फुटतो. तेथून साधारण २० कि.मी.वर बत्तीस शिराळा गाव आहे. सांगली जिल्ह्यातील हा निसर्गसमृद्ध भाग आहे. बत्तीस शिराळ्यापासून जवळच चांदोली अभयारण्य, चांदोली धरण आहेत. जेव्हा पूर्वी नागपंचमीचा हा उत्सव शिराळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा. नागपंचमीच्या दिवशी शिराळा गावात साधारणपणे १००-१२५ नागांची एकाच वेळी मिरवणूक काढली जाई. त्यानंतर नागाचे खेळ आयोजित होत. सर्वात उंच फणा काढणारा नाग, सर्वात लांब नाग अशा पकडलेल्या मंडळांना बक्षिसे मिळत. नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरिक येत. यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे २ वर्षांच्या बालकापासून ते वयस्कर माणसांपर्यंत सर्वजण न घाबरता गळ्यात नाग घालून फोटो काढत.
शिराळ्याची नागपंचमी पूर्वी देशातच नव्हे, तर परदेशांतही प्रसिद्ध होती. नागपंचमीसाठी पूर्वी लाखो लोक जमायचे; परंतु सापांचे होणारे हाल पाहून येथील निसर्ग व वन्यजीवप्रेमींनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार २००२ मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे तसेच मिरवणूक काढणे, प्रदर्शन करणे, त्यांच्या स्पर्धा भरवणे यांना बंदी केली. तसेच या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन, जिल्हा कोर्ट, वन खाते आणि पोलिसांवर सोपविली. त्यामुळे काही वर्षांपासून बत्तीस शिराळ्यात फक्त प्रतीकात्मक मिरवणूक काढली जाते.
हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल, तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला ‘रक्षाबंधन’ म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पोर्णिमेस राखी बांधावी, उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही या मागची मंगल मनोकामना असते.
नारळीपौर्णिमा हा सण समुद्रकाठी राहणाऱ्या व प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या मुख्य कोळी लोकांचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, नौका सुरक्षित राहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी लोक समुद्राला नारळ अर्पण करतात. महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा अखंड समुद्रकिनारा लाभलेला आहे. या ठिकाणी राहणाऱ्या कोळी लोकांचे उपजीविकेचे प्रमुख साधन किंवा व्यवसाय हा मासेमारी आहे. ते लोक श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. नारळी पौर्णिमेच्या काही दिवस अगोदर कोळी बांधवांनी समुद्रात जाणे बंद केलं असते. पावसाळ्यात समुद्रामध्ये मासेमारीसाठी उतरणारे कोळी लोकांना समुद्रापासून धोका असतो. त्यामुळे श्रावणी पौर्णिमेनंतर पावसाचा जोर थोडा कमी झालेला असतो. समुद्राची कृपा कोळी लोकांवर राहावी. म्हणून रितसर पूजा करून वाजत-गाजत सोन्याचा नारळ अर्पण करतात.
अशा प्रकारे नारळाची पूजा म्हणजेच निसर्गाची पूजा अर्थात वृक्षवल्ली, आम्हा सोयरे! जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. गोकुळाष्टमी हा श्रावण महिन्यात येणारा सर्व बालगोपाळांचा आणि गोविंदांचा आवडीचा सण आहे. कृष्ण जन्माच्या या दिवसाला श्रीकृष्ण जयंती, दहीहंडी, श्रीकृष्ण जन्माष्टमी असेही म्हणतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपूर्ण भारतात साजरा केला जातो. श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असताना झाला. म्हणूनच या दिवशी गौळणींचा लाडका कान्हा श्रीकृष्ण याचा जन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. कृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे अवतार आहेत, असे पुराणात वर्णन आहे. यादिवशी बरेचजण गोकुळाष्टमीचा उपवास करतात. सगळीकडेच या दिवशी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वचजण ‘आला रे आला गोविंदा आला’ असा जयघोष करत असतात. दहीहांडी म्हटलं की, आपल्या सर्वांच्याच डोळ्यांसमोर दिसतात त्या उंचच उंच दहीहंड्या आणि ती फोडण्यासाठी उभे असणारे गोविंदा.
भगवान श्रीकृष्णांना दही, दूध, लोणी हे पदार्थ खूप आवडत असे. दही, दूध, लोणी आणि लाह्या हे सगळे एकत्र करून बनवलेला पदार्थ म्हणजे काला. श्रीकृष्ण गायी चरताना स्वतःची व सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून ते सर्व खाद्यपदार्थ एकत्र करून त्याचा काला करत असे आणि आपल्या सवंगड्यांसह खात असे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करतात. गोपाळकाल्याच्या दिवशी दही, दूध, लोणी आणि लाह्या, पोहे, दाणे, लोणचे,मीठ, यांचा काला “गोपाळकाला’ करून प्रसाद म्हणून सर्वांना वाटतात. तसेच मंजिरी – (धनापावडर, गूळ, खोबरं, सुंठ, खडीसाखर.)
याच दिवशी दही दुधाने भरलेली हंडी उंच बांधून ही दहीहंडी सर्व गोविंदा एकत्र येऊन फोडतात. आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये गोकुळाष्टमीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. वृंदावन, मथुरा, गोकुळ, द्वारका या ठिकाणी तर हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कारण याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचे जन्मस्थान असल्यामुळे तिथे मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमी साजरी होते.
हिंदू लोक श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपवास करतात. यादिवशी श्रीकृष्णाची पूजा करतात, रात्री उशिरापर्यंत जागतात आणि श्रीकृष्ण जन्माच्या वेळेला रात्री १२ वाजता प्रार्थना, पूजा करतात. कृष्णाच्या लहानपणीचा फोटो किंवा मूर्ती पाळण्यात ठेवतात.
आताच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञानप्रिय जगात गोकुळाष्टमी साजरी करताना, दहीहंडी जास्त उंच न बांधता, खाली बांधून तिचा आनंद घ्यावा. जर उंच बांधली असेल, तर संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात आणि मगच या दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा आयोजित कराव्यात. कारण दरवर्षी बऱ्याच गोविंदांना यामध्ये आपला जीव गमवावा लागतो. नाचगाण्याचे बीभत्स कार्यक्रमास स्थान नसावे.
पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्येला बैलाची कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात, खांदेशात, भव्य पातळीवर साजरा केला जातो, ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो, असा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा. ज्या दिवशी बैलांकडून कुठलेही कामकाज केले जात नाही. त्याच्या मानेवर जू ठेवली जात नाही. असा हा व्रत वैकल्याचा सणांचा, आनंददायी, उत्सवाचा आणि उत्साहाचा श्रावण मास कसा संपतो समजतही नाही. गेल्या दोन वर्षात सणावर कोरोनामुळे निर्बंध आल्यामुळे ते उत्साहात साजरे झाले नव्हते. परंतु आता जरी सणवार साजरे करायचे निर्बंध उठवले असले तरी सुरक्षितेच्या दृष्टीने जे काही नियम घालून दिले जातील ते पाळूनच दहीहंडी पोळा आदी सणवार साजरे करायचे आहे हे लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.