कणकवली (प्रतिनिधी) : बेकायदेशीर उत्खननाबाबत खनिकर्म विभाग थेट ॲक्शन मोडमध्ये आला आहे. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सिलिका वाळू व्यवसायिक संजय आग्रे यांची वाघेरी येथील सिलिका मायनिंग कंपनी बेकायदा सीलिका उत्खनन केल्याप्रकरणी सील करून, दंडात्मक कारवाई केली आहे.
तो दंड वसूल करण्याचे आदेश कणकवली तहसीलदार यांना पारित केले आहेत. यात पूर्वी विक्री केलेले खनिजसुद्धा अवैध म्हणून घोषित केले असल्याने एकूणच उत्खननावर ही दंडात्मक कारवाई होणार आहे. किमान ५० ते १०० कोटींच्या घरात हा दंड होईल, अशी माहिती महसूलच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे बेकायदेशीर सिलिका उत्खनन करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या खाण कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत, तर तहसीलदार आर. जे. पवार यांनी आपल्याला या प्रकरणी खनिकर्म विभागाचे पत्र प्राप्त झाले असून दंडाच्या दर पत्रकाप्रमाणे कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.