प्रति युनिट १ रुपये वीज सवलत; एकनाथ शिंदे यांची मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली घोषणा
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट ५० हजारांचे अनुदान देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नियमित कृषी कर्ज फेडणाऱ्या शेतक-यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. याचबरोबर शेतकऱ्यांना प्रति युनिट १ रुपयांची वीज सवलत देणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. शिंदे सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
शेतकऱ्यांची कर्जफेडीची तीन वर्षांची मुदत दोन वर्षांवर आणली आहे. हजारो एकर जमीन ओलिताखाली आणण्यात येणार आहे. यासाठी भातसा धरणासाठी १५५० कोटींची मान्यता देण्यात आली आहे. लोणार सरोवर विकासासाठी ३७० कोटी देण्यात येणार असल्याचे शिंदे म्हणाले.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय…
- राज्यात वीज वितरण यंत्रणा सुधारणार. ग्राहकांना स्मार्ट व प्रिपेड मीटर्स देणार
- महावितरण व बेस्ट उपक्रमामार्फत सुधारित वितरण क्षेत्र योजना-सुधारणा अधिष्ठित आणि निष्पत्ती-आधारित योजना
- अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनेच्या शेतकऱ्यांना वीज दरात सवलत देणार
- दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती
- विधि व न्याय विभागात सह सचिव (विधि) (गट-अ) पद नव्याने निर्माण करणार
- लोणार सरोवर जतन, संवर्धन व विकास आराखड्यास मान्यता
- १५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढलेल्या ५० अतिरिक्त जागांसाठी राज्याचा हिस्सा
- राज्यात कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर ३ नवीन समाजकार्य महाविद्यालये स्थापणार
- ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना प्रकल्पास ८९०.६४ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता
- जळगांव जिल्ह्यातील वाघुर प्रकल्पास २ हजार २८८.३१ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता
- ठाणे जिल्ह्यातील भातसा पाटबंधारे प्रकल्प १ हजार ४९१.९५ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता
- हिंगोली जिल्ह्यात ‘मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र’
- शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान. पूर व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा लाभ
- ग्रामीण भागातील भूमिहीन लाभार्थीना जागा देण्याबाबत विविध सवलती
- राजकीय व सामाजिक आंदोलनातील मार्च २०२२ पर्यंतचे खटले मागे घेण्याबाबत कार्यवाही