डॉ. विजया वाड
ऑफिसमध्ये ऑडिट होतं आज. मंजूनं सगळ्या फायली बाबूकडून काढून घेतल्या. व्यवस्थित तारखेवार लावल्या. बाबूची भरपूर मदत झाली. त्याला इंग्रजी समजत असल्याने, डेटवाइज लावताना अडचण आली नाही.
“थँक्यू बाबू.” “आता ऑडिटर येऊ देत नाही तर ऑडिटरचा बाप. चिंता नाही.” ती जोषात म्हणाली. तेवढ्यात बडे साहेब व्यवस्थापकांना घेऊन आले.
“मला खूप बरं वाटलं.” सायलेन्स मोडत सुपरिटेंडेंट आत आला. सारं ऑफिस खाडखाड् उभं राहिलं.
व्यवस्थापक खूशम खूश झाले. संगतवार पाहणी झाली.
“एव्हरी थिंग अप टू डेट.” पॉझिटिव्ह शेरा मिळाला.
बाबूसकट उच्च अधिकाऱ्यासकट सारे खूश! मंजूचा उजळलेला चेहरा बाबूसाठी चमकती शलाका होता.
इतक्यात सोसाट्याचा वारा आला. खिडकीतून थेट आत. कागद पाचोळ्यासकट उडाले.
“बाबू, धाव ते धर. हे पकड” मंजू बडबडली.
बाबूने प्रथम खिडकी बंद केली. वारं बंद झालं. नंतर आवर-सावर केली.
ऑफिसमधले सुखात्मे, विचारे ही धावाधाव, मदत करीत होते बाबूला. मंजूही वाकली होतीच की.
इतक्यात ऑडिटर आले आणि ऑफिसर फायलीत बुडाले. ऑडिटर सुखात्मेवर जाम खूश दिसले. मंजूची तडफ त्यांना आवडली.
बाबूची कामाची पद्धत ऑडिटरने वाखाणली.
बारावी झालेला शिपाई! “ग्रॅज्युएशन कर. फी मी भरतो. आजपासून क्लास लाव सायंकाळचा बाबू. या राष्ट्रातला प्रत्येक माणूस शिकला पाहिजे.”
ऑडिटर वदले.
“क्लास फोर प्लीज कम इनसाइड.”
क्लास फोर सर्व्हंट्स छाती पुढे काढून आत गेले. क्लर्क लोकांपेक्षा आता त्यांना महत्त्व दिले गेले ना! निदान त्या दिवशी.
“सी, आय डोंट बिलीव्ह इन क्लास! तुम्हाला त्रास देतो का कुणी? आताच सांगून टाका. एकेकाची कढी पातळ करतो मी. आय विल नॉट स्पेअर एनी वन.”
“अरे सायबा, एक तास येऊन रोज मरा जिंदगीत. तू काय बदल घडवणार?” बाबू मनातल्या मनात पुटपुटला.
छबू शिपाईण “हा जाईल. तोफेच्या तोंडी आपण!” असे म्हणाली.
“बरोबर आहे तू म्हणतीस ते.” रघू शिपाई दुजोरा देत म्हणाला छबूला पाठिंबा!
रघू, छबू, बाबू कोणीही काही बोलले नाही. ऑडिटरने ‘ऑल इज वेल’ शेरा ऑफिसला दिला नि गेले निघून. आले तसे गेले.
“बाबू अॅण्ड टीम – अभिनंदन.” सुखात्मे म्हणाले.
“मग? आमचे कामच आहे ते.” बाबू छाती फुगवून म्हणाला.
“बाबू, बाहेरच्या लोकांशी चांगला वागतोस. ऑफिसात मात्र अक्कड!”
“कोण बरं म्हणालं? मी नेहमी बाबू सारखाच वागतो. आई, काकूचे संस्कार.”
“असं का?” एक कोरस. मग चुप्पी. सारं ऑडिटरच्या ‘गुड’ रिमार्कनं आनंदलेलं ऑफिस मग परत कामात गढून गेलं. ऑफिसची वेळ संपली.
बाबू बसस्टॉपवर मंजूची वाट बघत उभा होता.
पण मंजू ऑफिसच्या बॉससोबत रिक्षाने गेली. बाबू नर्व्हस झाला. इतक्यात बस आली. आता बसमध्ये चढण्यावाचून गत्यंतर नव्हते. बाबू मुकाट्याने बसमध्ये. साधारण तिकीट काढले. टीटीएमएम आज मंजू नव्हती ना. रिक्षात फक्त बॉस आणि मंजू? तिसरी सीट? मांडीला मांडी घासण्याचे स्वप्न तरुणपणी त्रास देते ना? बाबूला असा त्रासच त्रास झाला. पण करणार काय? बस वेगाने धावत बसस्टॉपवर आली. नाइलाजाने बाबू उतरला.
“काकू” बाबू रस्त्यावर उभ्या. काकू नि आईकडे बघत म्हणाला, तशा रडव्या होत म्हणाल्या,
“बाबू, बुलडोझर फिरवणार झोपडीवर.”
“अनधिकृत बांधकाम म्हणून,” आईने पुस्ती जोडली.
“अरे बापरे! मग सामान-सुमान!”
“सर्व सुरक्षित आहे. मुनशिपल शाळा नंबर पाचमध्ये.”
“मग ठीक.”
“चोरी बिरी व्हायला हाय काय अन्
नाय काय?”
“सर्वे जुने कपडे नि जुनी गाठोडी.”
काकू नि आई बडबडत होत्या. चला आता मुन्शिपालटीच्या शाळेत मुक्काम.
कोरोनामुळे शाळा बंद हे सरकारवर उपकार नायतर कुठे ठेवले असते? अंधशाळेत? कमला मेहता अंधशाळा बाबूला आठवली. तिथल्या अंध जगात राहायची वेळ मागे आली होती. केवढा शहारला होता बाबू!
‘अंधांचे विश्व’ वेगळे होते. अंधार कोठडी म्हणजे जीवन! बाप रे बाप!