मृणालिनी कुलकर्णी
पावसाळा आणि मरिन ड्राइव्ह समुद्रकिनाऱ्याचे एक अनोखे नाते आहे. आषाढातला कोसळणारा पाऊस, उसळणाऱ्या लाटा पाहण्यासाठी, मुंबईकरांसह परदेशी पर्यटकांचीही पावलं मरिन ड्राइव्हकडे वळतात. मुंबईची एक ओळख, दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्ह म्हणजेच ‘क्वीन नेकलेस’, ‘राणीचा रत्नहार’ होय. कोरोना साथीच्या आधी इथे कधीही, कोणीही, केव्हाही विसावून सागराशी हितगुज करू शकत होते.
मुंबई हे दुसरे लंडन शहर वसविण्याच्या ब्रिटिशांच्या इराद्यानुसार त्या भागातील वास्तू कलात्मक उभारण्यात आल्या. समुद्राच्या ताज्या हवेसाठी दक्षिण मुंबईतील समुद्राचे टोक असलेल्या नरिमन पॉइंटपासून मरिन लाइन्स, चर्नी रोड या स्टेशनमार्गे राजभवनपर्यंत अथांग समुद्रासमोरील इंगजी सी आकाराचा कठडा हेच मरिन ड्राइव्ह. ४.३ किलोमीटर लांबीचा, उंच, रुंद फलाट असलेल्या कठड्यालगत भिंतीच्या संरक्षणासाठी, समुद्राच्या रौद्र लाटा थोपविण्यासाठी, त्यात सिमेंटचे टेट्रापॉड टाकले आहेत. छोटे सागरी जीव तेथे सापडतात. विस्तीर्ण मोठा किनारा लाभलेल्या कठड्यावर सुट्टीच्या दिवशी बसायलाही जागा नसते.
सूर्योदयापेक्षा सूर्यास्त पाहायला येणाऱ्यात तरुण, नवदांपत्य, महिलांचा समावेश जास्त दिसून येतो. सूर्यास्ताला साक्षी ठेवून संसाराला सुरुवात करणाऱ्यांच्या भेटीगाठी, आणाभाका; त्याचप्रमाणे पडत्या/धडपडणाऱ्या/कठीण काळात, निराश मनस्थितीत; मनःशांतीसाठी, लोकांना याच समुद्राने सहृदयतेने दिलेली साथ, दिलेला वेट आणि वॉचचा आशावाद कोण विसरेल?
कामावरून घरी जाताना थोडा वेळ येथे विसावून, समुद्राची हवा अंगावर घेत शिणवटा घालवत नोकरदार वर्ग चर्चगेट स्टेशनकडे वळतात. दृष्टीच्या आवाक्याबाहेर दूरवर पसरलेला समुद्र, क्षितिजाला भिडलेले आकाश पाहता, क्षितिजापलीकडे काय असेल? हा प्रश्न मनी डोकावतो. कठड्यावर बसून लाटांचे निरीक्षण करताना सूर्यास्ता वेळच्या संधीप्रकाशात धीम्या गतीने बदलत जाणाऱ्या आकाशातील रंगछटा, दिवसाचे रात्रीत होणारे स्थित्यंतर, या निसर्गाच्या किमयेने हरवून जातो.
शांत रात्री आकाशात चमचमणारे असंख्य तारे, गार वारा, भरती-ओहोटीनुसार लाटांचा मंद किंवा खळखळ आवाज, पाठीमागे पाहता डोळे दीपवणारी वक्राकार पिवळ्या दिव्यांनी उजळून निघालेला हाच राणीच्या गळ्यातील रत्नहार. अर्थात “क्वीन्स नेकलेस”. या दिव्याच्या रांगेत मोटारीचे लाल दिवे नेकलेसमधील लाल खडे वाटावेत असे मध्ये मध्ये लुकलुकत असतात. हेच मुंबईचे मोठे वैभव. ओपन टू ऑल.
१०० वर्षे झाली. सर्वसामान्यांपासून प्रथितयश छायाचित्रकारापर्यंत अनेकांनी मुंबईचे हे वैभव आणि तो परिसर आपापल्या कॅमेरात टिपला आहे. चित्रपटसृष्टीचा मरिन ड्राइव्हशी अत्यंत जवळचा संबंध आहे; परंतु हवाई छायाचित्रणाला सुरुवातही झाली नसताना १९७७ ला प्रसिद्ध छायाचित्रकार गोपाळ बोधे यांनी सर्वप्रथम मरिन ड्राइव्हचा हा ‘क्वीन नेकलेस’ आरबी ६७ या कॅमेरात दहा फ्रेममध्ये बंदिस्त केला. नरिमन पॉइंट ते राजभवनचा परिसर टिपणाऱ्या फोटोची प्रिंट वीस वर्षांनी काढली गेली. या स्थळाचे वर्णन ‘जगातील सर्वात मोठी निसर्गदत्त गॅलरी’ असे केले गेले होते. म्हणूनच काही वर्षांपूर्वी भारताच्या हवाई दलाची चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके मुंबई येथे झाली होती. २०१४ साली २६ जानेवारीचा संचालनाचा कार्यक्रमही या समुद्रासमोरील रस्त्यावर झाला होता. आम्ही सुदैवी, मरिन ड्राइव्ह लगतच १२ वर्षे राहत होतो.
हरि ओम, जय श्रीराम असे म्हणत हात उंचावत एकमेकांना साद देत, वेगे वेगे धावूच्या गतीने चालणाऱ्यांची वर्दळ येथे सूर्योदयापूर्वीच सुरू होते. कोणी एकटे, कोणी दोघे-चौघे, नाहीतर छोटा गट, चालू घडामोडींवर भाष्य करीत चालणारा निवृत्तांचा मोठा गट, गाणे ऐकत चालणारे, मौन व्रताने मार्गस्थ होणारे, मोजकेच स्पर्धेसाठी धावणारे, उलटे चालणारे, प्रत्येकाची गती वेगळी, चालीचा डौल वेगळा, तो स्वतःच्या अस्तित्वाची ओळख दर्शविणारा असतो.
शरीरस्वास्थ्याचे महत्त्व जाणणारी पिढी, खुल्या आकाशात, खुल्या वातावरणात, स्वतःच्या प्रकृतीनुसार, गरजेनुसार, दुखण्यानुसार व्यायाम करीत असते. जो तो आपापल्या विश्वात असतो. एनसीपीएच्या रस्त्यावर स्केटवर धावणारी, सायकल चालवणारी लहान-मोठी तरुण मुले, मासेमारीसाठी झेंडा फडकवत बाहेर पडणाऱ्या लहान बोटी, नित्यनियमाने फुटपाथ साफ करणारे सफाई कामगार, कठड्याच्या पायरीवर बसून अध्यात्माचे नामस्मरण करणारे ज्येष्ठ महिला गट, नरिमनच्या टोकाला कुणीही सामील व्हावे, असा मोठा गट त्यांच्या गडगडाटी हास्याने व देवाच्या नावे तालावर घालणाऱ्या दंडवताने लक्ष वेधून घेतो.
स्वच्छ फुटपाथाच्या कडेला दर २५ पावलावर, मध्यम उंचीचे, मोठ्या पानाचे, रात्री फुलणाऱ्या सुगंधी समुद्रफुलांची झाडे आहेत. समुद्रावरील वाहणारा खारा वारा, क्षितिजावर फाकलेली किरणे अशा आल्हादायक वातावरणात आपले शरीर आणि मन प्रसन्न होते.
समुद्राच्या समोरच्या फुटपाथला लागून असलेल्या कमी उंचीच्या, कलात्मक टच असलेल्या गोलाकार इमारतीतील प्रशस्त गॅलऱ्या, त्याच्या मागे-पुढे एअर इंडिया, मारिन प्लाझा, सी. सी. आय. क्लब, वानखेडे स्टेडियम, तारापोरवाला मत्स्यालय, बालभवन या प्रसिद्ध वास्तू आहेत. मुसळधार पाऊस आला की, लगेच आम्ही दोघे मरिन ड्राइव्हवर पावसात भिजायला जात होतो. त्याहीपेक्षा कठड्यावर उभे राहून एकमेकांत मिसळत त्या लाटा पुढे कशा येतात, याचे औसुक्य मला होते. ट्रायपॉडवर आपटून उडणारा, उसळणाऱ्या लाटांचा फवारा पाहण्यासाठी, अंगावर घेण्यासाठी जात होतो. दर वर्षी मरिन ड्राइव्ह येथील उसळलेल्या उंच लाटेचा फोटो सारे पाहतातच.
समुद्र आपल्याला काय देतो, हे समजते. त्याहीपेक्षा आपण समुद्राला जाता-जाता काय देतो, हे उसळलेल्या लाटेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला गेल्यावर कळते. लाटेबरोबर आलेला, फुटपाथला चिकटलेला कचरा, सफाई कामगार खराट्याने जोर लावून काढताना पाहिले, वाऱ्याबरोबर फिरणारे चहाचे कप आणि लेजची पाकिटे पाहून मन विषण्ण होते. समुद्राकडून शुद्ध हवा घेताना आपण समुद्राला काय देतो, याची नोंद घ्यावी.
मरिन ड्राइव्ह किनाऱ्याचा, अलौकिक राणीचा रत्नहार पाहण्यासाठी वर्षभर हवशे, गवशे, नवशे येथे नेहमी येतात. समुद्राची पुढे येणारी लाट आपल्या विचाराला ‘पुढे जा’ हा विचार जागविते व आपले जीवन आनंददायी बनविते.