नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत २१ हजार ४११ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, ६७ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना बाधितांचा आलेख उतरतीला लागला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने कोरोनाचे २१ हजारांहून अधिक रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांसह प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
#COVID19 | India reports 21,411 fresh cases, 20,726 recoveries and 67 deaths in the last 24 hours.
Active cases 1,50,100
Daily positivity rate 4.46% pic.twitter.com/jxr8ep9utB— ANI (@ANI) July 23, 2022
सध्या देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ५० हजार १०० वर पोहोचली आहे. एकीकडे नव्या बाधितांमध्ये वाढ जरी होत असली तरी रूग्ण बरे होणाऱ्यांची संख्यादेखील मोठी असून, गेल्या २ तासांत देशात २० हजार ७२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात २४ तासांत आढळले २५१५ नवे रुग्ण
देशापाठोपाठ महाराष्ट्रातही कोरोनाच्या नव्या बाधितांची संख्या सातत्याने वाढताना दिसून येत आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल २५१५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर २४४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
बीए ५ व्हेरियंटचे दोन नवे रुग्ण
राज्यात आज बीए ५ व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले आहेत. हे दोन्ही रुग्ण परराज्यातील आहेत. यासोबतच राज्यात बीए ४ आणि बीए ५ रुग्णांची संख्या ही १६० वर पोहोचली आहे. त्यामध्ये पुण्यात ९३ रुग्ण, मुंबईमध्ये ५१ तर ठाणे ५, नागपूर आणि पालघरमध्ये प्रत्येकी ४ आणि रायगडमध्ये ३ रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण ७८,६७,२८० कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.९७ टक्के इतकं झालं आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर हा १.८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान मुंबईत अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १८७१ वर पोहचली आहे. तर राज्यात १४२ स्वाइन फ्लू (इन्फ्लुएंझा ए एच१एन१) प्रकरणे आणि १ जानेवारी ते २१ जुलै दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये ७ मृत्यूची नोंद देखील झाली आहे.