Wednesday, April 30, 2025

रत्नागिरी

कोंढेतडजवळील मातीचा भराव ठरतोय पूरस्थितीला आमंत्रण

कोंढेतडजवळील मातीचा भराव ठरतोय पूरस्थितीला आमंत्रण

राजापूर (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर सर्वाधिक उंचीचा पूल बांधण्यात आला. या पुलाच्या बांधकामावेळी संबंधित ठेकेदार कंपनीने नदीपात्राच्या मध्यभागी आणि कोंढेतडच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकला. पावसाळ्यामध्ये हा भराव जैसे थे राहिल्याने नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलून त्याचा फटका गत वर्षी शीळ-गोठणे-दोनिवडे-चिखलगाव रस्त्याला बसला होता, तर काही प्रमाणात वाहून आलेली माती बंदरधक्का परिसरामध्ये साचल्याने नदीपात्रातील गाळाच्या संचयामध्ये अधिकच भर पडली. कोंढेतडच्या बाजूचा हा मातीचा भराव अजूनही जैसे थे असल्याने त्यामुळे पूरस्थितीजन्य परिस्थिती उद्भवत आहे. या विरोधात कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अर्जुना नदीपात्राच्या काठावर मातीचा भराव काढण्याचे संबंधित ठेकेदाराला महसूल प्रशासनानेही निर्देश दिले असून त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्र अरुंद होण्यासह पूरस्थितीला कारणीभूत ठरणारा मातीचा भराव अन् गाळ उपसा न झाल्यास उपोषण छेडण्याचा इशाराही अरविंद लांजेकर यांनी दिला आहे. वारंवार केलेल्या तक्रारीनंतर संबंधित ठेकेदार कंपनीने नदीपात्राच्या मध्यभागी टाकण्यात आलेला मातीचा भराव काढला. मात्र कोंढेतडच्या बाजूचा भराव जैसे थे स्थितीमध्ये ठेवला. त्यामुळे पूरस्थितीला आमंत्रण देणारा आणि त्या भागामध्ये नदीपात्र अरुंद होण्यास कारणीभूत ठरणारा त्या भागातील मातीचा भराव तातडीने काढावा, अशी मागणी लांजेकर यांनी केली होती.

याबाबतचे निवेदन त्यांनी महसूल प्रशासनाला दिले होते. त्यांच्या निवेदनासह येथील व्यापाऱ्यांनीही महसूल प्रशासनाला निवेदन देऊन पुराला कारणीभूत ठरणारा गाळ उपशासह माती भरावाचा उपसा करण्याची मागणी केली आहे. त्याप्रमाणे महसूल प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला मातीचा भराव उपसा करण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचेही महसूल प्रशासनाने लक्ष वेधून योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. मात्र त्याची संबंधितांकडून अद्याप कोणतीही दखल घेतलेली नसून नदी काठावरील मातीचा भराव जैसे थे स्थितीमध्ये राहिलेला आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment