
मुंबई : माझ्या वडिलांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा एकनाथ शिंदेंप्रमाणेच त्यांनाही मारण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून सुपाऱ्या देण्यात आल्या होत्या, असे खळबळजनक ट्विट आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदेना झेड प्लस सुरक्षा देण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाकारल्याचा दावा शिवसेनेतले बंडखोर आमदार सुहास कांदेंनी काल केला. तेव्हापासून हे प्रकरण चांगलेच पेटले आहे. त्यावरुन आता नितेश राणेंनीही एक ट्वीट केले आहे. आपण व्याजासकट वस्त्रहरण करु, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1550676638827954177
आपल्या ट्वीटमध्ये नितेश राणे म्हणतात, माझ्या वडिलांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा एकनाथ शिंदेंप्रमाणेच त्यांनाही मारण्यासाठी तथाकथित शांत आणि संयमी पक्षप्रमुखांकडून अनेक 'सुपाऱ्या' देण्यात आल्या. हे 'म्याव म्याव' संपवून टाकूया त्यानंतर आपण व्याजासह 'वस्त्रहरण' सुरू करू.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती. यावेळी नक्षलवाद्यांकडून शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गुप्तचर यंत्रणांनी तसा अहवालही दिला होता. त्यामुळे गृहविभागाने शिंदेंना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय़ घेतला होता. पण, तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंना फोन करुन झेड प्लस सुरक्षा देण्यास मनाई केली, असा आरोप शिवसेनेतले बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.
भोली सुरत दिल के खोटे....
आमदार नितेश राणेंच्या घणाघाताने ठाकरेंच्या खोट्या सोज्वळपणाचा बुरखा फाडला!
ज्यांचा मुलगा राज्यभर फिरून आपले वडील फार सोज्वळ आहेत, फार साधे आहेत, प्रेमळ कुटुंबप्रमुख आहेत असे सांगत आपल्या पक्षप्रमुखाची इमेज तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच पक्षप्रमुखांकडून राणेसाहेबांची सुपारी देण्याचे काम असंख्य वेळा झालेले आहे. याची माहिती आमच्याकडे आहे, ठोस पुरावेही आहेत आणि योग्य वेळ आल्यानंतर ज्याला आपण साधाभोळा समजतो तो केवढा विकृत व कपटी आहे याची माहिती महाराष्ट्रासमोर देईन असा घणाघात भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. आमदार कांदे, तत्कालीन गृहमंत्री शंभूराज देसाई यांच्या उद्धव ठाकरे यांच्यावरील आरोपांचा धागा पकडत राणे यांनी केलेल्या थेट टिकेने राजकारणात खळबळ उडाली आहे.
आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत आज बेधडक भूमिका मांडली. एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांचा धोका असतानाही सुरक्षा न देण्याची भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली होती, त्यामागे काही दुर्दैवी घटना घडून शिंदे संपावेत या हेतूने असल्याचा आरोप राणे यांनी केला. नारायणराव राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर अनेकदा त्यांचीही सुपारी देण्यात आल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की काही दिवसांपासून महाराष्ट्रभर दौरे काढले जात आहेत आणि कानाकोपऱ्यातून म्याव-म्याव सुरू आहे. हे म्याव-म्यावचे आवाज बंद झाल्यानंतर कसे काय "वस्त्रहरण" होणार हे आम्ही महाराष्ट्राला दाखवू. मुख्यमंत्री आजारी असताना बंड केले म्हणत हे सहानुभूती घेत आहेत, तर मग मुंबईचे पालकत्व असलेले हे पर्यटन मंत्री मुंबईची जनता कोरोनाने आजारी असताना संध्याकाळी सातनंतर दिनो मोरियाच्या घरी काय करायचे? आपले वडील आजारी आहेत हे तेव्हा त्यांना दिसत नव्हते का? आपल्या वडिलांची काळजी असलेल्याना दुसऱ्याच्या वडिलांना जेवणाच्या ताटावरून उठवत अटक करताना काही वाटले नाही का, असा बोचरा सवाल करत ट्रेलर म्हणून ट्विटच्या माध्यमातून मी त्यांचा खोटा प्रचार जनतेसमोर आणला आहे. हे म्याव म्याव संपले की उर्वरित वस्त्रहरण पण मी करेन असे सांगत तुमची आक्रमकता काय आहे ते नितेश राणेंना दाखवा, मग बघू असा इशाराही त्यांनी दिला. नुसते म्याव म्याव केले तर महाराष्ट्रासमोर ही हालत झाली, अख्खा समोर उभा राहीन तेव्हा काय होईल याचा विचार करा असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले आहे. एकूणच महाराष्ट्राचे राजकारण या आव्हान प्रतिआव्हानांतून ढवळुन निघते आहे आणि पुढेही निघणार असे एकूण चित्र दिसते.