मुंबई (प्रतिनिधी) : नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी लागणारी नीट यूजी २०२२ परीक्षा झाली. या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील टॉप मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी २०-२० लाख रुपयांना जागा विकल्या गेल्या आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये याचे रॅकेट पसरले आहे. नीट यूजी २०२२ परीक्षेत फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने सोमवारी ८ जणांना अटक केली. यामध्ये मास्टरमाईंडचाही समावेश आहे. पेपर सोडवण्यासाठी २०-२० लाख रुपयांना जागा विकल्या गेल्याची माहिती मिळत आहे. या रॅकेटमध्ये काही टॉप कोचिंग इन्स्टिट्यूटची नावे पुढे आली आहेत.
फसवणूक टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी नीटसाठी सुरक्षा तपासण्या कडक केल्या होत्या. परीक्षा हॉलमध्ये पर्स, हँडबॅग, बेल्ट, कॅप्स, दागिने, शूजवरही बंदी होती. उमेदवारांना कोणतीही स्टेशनरी नेण्याची परवानगीही नव्हती. पण या रॅकेटने पेपर सोडवणाऱ्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळावा म्हणून मॉर्फ केलेल्या छायाचित्र्यांचा वापर केला आणि ओळखपत्रात फेरफार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.