रत्नागिरी (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स हा निर्देशांक विकसित केला असून, त्यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांच्या डिजिटल उपस्थितीसाठी गुण देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर महास्टुडंट अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपद्वारे सरल प्रणाली अंतर्गत शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजिटल उपस्थिती नोंदवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यांकन करणे सोपे होणार आहे.
शाळांचे शैक्षणिक निकषांचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र शासनाने परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स हा निदेशांक विकसित केला आहे. या निदेशांकामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजिटल पद्धतीने हजेरी नोंदविली जाणार असून त्यासाठी गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. यापूर्वी राज्यात विकसित केलेल्या सरल प्रणाली अंतर्गत विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी केली जात होती. ही नोंदणी केलेल्या विद्यार्थी व शिक्षकांची डिजिटल उपस्थिती नोंदवण्यासाठी महास्टुडंट अॅप तयार करण्यात आले आहे.
शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची सरल प्रणाली अंतर्गत महास्टुडंट अॅपद्वारे दैनंदिन हजेरी नोंदवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी गुगल स्टोअरवर असलेले हे अॅप इन्स्टॉल करायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांची दैनंदिन उपस्थिती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच दररोज शाळेत किती विद्यार्थी उपस्थित राहतात व शिक्षक किती उपस्थित राहतात, याबाबतचे सर्व रेकॉर्ड राहणार असल्याने शिक्षण विभागाला हवे तेव्हा सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. शिक्षकांना वेगळे हजेरी पत्रक ठेवण्याची गरज नाही. तसेच मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत वेगळी माहिती भरण्याची कटकट राहणार नाही. महास्टुडंट अॅपवर सर्च केल्यावर राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर एका क्लिकवर शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध होणार आहे.