Tuesday, April 29, 2025

अग्रलेखसंपादकीयमहत्वाची बातमी

श्रीलंकेत अराजक!

श्रीलंकेत अराजक!

सुकृत खांडेकर

भारताचा शेजारी असलेल्या श्रीलंकेला गेली दोन वर्षे आर्थिक संकटाने घेरल्यामुळे सर्वसामान्य जनता रस्त्यावर आली. जीवनाश्यक वस्तूंची मोठी टंचाई भेडसावत आहे. महागाईने कळस गाठला आहे. पेट्रोल– डिझेल पाचशे रुपये लिटरवर पोहोचले आहे. सत्ताधारी राजपक्षे परिवाराविषयी जनमानसात प्रचंड आक्रोश आणि प्रक्षोभ प्रकटला आहे. दि. ९ जुलैला संतप्त निदर्शकांनी राष्ट्रपती निवासाला घेराव घातला व नंतर हजारो निदर्शक राष्ट्रपती निवासात घुसले आणि तेथे मनमुराद लुटालूट सुरू झाल्याचे चित्र जगाला दिसले. श्रीलंकेमध्ये अराजक निर्माण झाल्याने कुणाचा कुणाला मेळ नाही. राज्यकर्त्यांच्या विशेषत: राजपक्षे परिवाराच्या विरोधात निर्माण झालेला प्रक्षोभ शांत करणे कुणालाच शक्य झालेले नाही. या पूर्वी प्रक्षुब्ध जमावाने राजपक्षे यांचे लहान भाऊ व माजी पंतप्रधान महिंद्र राजपक्षे यांच्या कोलंबो येथील निवासाला घेराव घातला तेव्हा महिंद्र यांनी आश्रय घेण्यासाठी नौदलाचा तळ गाठला. दि. १२ मे रोजी महिंद्र राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यावर विक्रमसिंघे हे पंतप्रधान झाले होते. राजपक्षे परिवाराने सत्तेची सर्व मोक्याची व महत्त्वाची पदे काबीज करून श्रीलंकेला बेसुमार लुटले, अशीच भावना तेथील सर्वसामान्य जनतेत निर्माण झाली आहे.

देशाला आर्थिक संकटात ढकलायला राजपक्षे परिवारच कारणीभूत आहे, अशी भावना देशात बळावली आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे, पंतप्रधान महिंद्र राजपक्षे, अर्थमंत्री बासिल राजपक्षे, सिंचन मंत्री चामल राजपक्षे आणि क्रीडामंत्री नामल राजपक्षे या सर्वांच्या विरोधात देशात असंतोषाचा वणवा पेटला आहे. या सर्वांनाच आपल्या पदाचे राजीनामे देण्याची पाळी आली. एक काळ असा होता की, श्रीलंकेचे ७० टक्के बजेट हे राजपक्षे परिवाराच्या हाती एकवटले होते. राजपक्षे परिवाराने ४२ हजार कोटी रुपये बेकायदेशीरपणे परदेशात गुंतवले आहेत, असा आरोप केला जात आहे. राजपक्षे परिवाराला मदत करण्यात सेंट्रल बँक ऑफ श्रीलंकेचे गव्हर्नर अजित निवार्ड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असेही सांगण्यात येत आहे. शहात्तर वर्षांचे महिंद्रा राजपक्षे हे परिवाराचे प्रमुख आहेत. २००४ मध्ये पंतप्रधान म्हणून भूमिका पार पाडल्यावर २००५ ते २०१५ या काळात ते राष्ट्रपती होते. तामिळी लोकांचे आंदोलन चिरडून टाका, असे त्यांनीच आदेश दिले होते. जनतेचा असंतोष वाढू लागताच त्यांनी १० मे रोजी राजीनामा दिला. महिंद्र यांच्या कारकिर्दीतच श्रीलंका व चीन यांची जवळीक वाढली. पायभूत सुविधा उभारण्यासाठी त्यांनी चीनकडून ७ लाख अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले. मोठमोठी कर्ज घेतलेले प्रकल्प कागदावरच राहिले, त्यात फार मोठा भ्रष्टाचार झाला. राजपक्षे परिवारात सर्वात शक्तिमान महिंद्र होते म्हणूनच त्यांना द चीफ म्हटले जायचे. माजी लष्करी अधिकारी असलेले गोटाबाया २०१९ मध्ये श्रीलंकेचे राष्ट्रपती झाले. संरक्षण सचिवापासून त्यांनी अनेक जबाबदारीची पदे संभाळली आहेत. ७१ वर्षांचे बासिल राजपक्षे हे अर्थमंत्री होते. सरकारी कामासाठी दिलेल्या कंत्राटात ते कमिशन घेत असत, म्हणून त्यांना मिस्टर १० पर्सेंट म्हटले जायचे. सरकारी खजिन्यात त्यांनी लाखो डॉलर्सची हेराफेरी केल्याचे आरोप झाले. गोटाबाया राष्ट्रपती झाल्यावर त्यांच्यावरील सर्व कारवाया रद्द झाल्या. ७९ वर्षांचे चामल हे महिंद्र यांचे मोठे बंधू आहेत. जहाज व नागरी उड्डाण मंत्री म्हणून त्यांनी काम केले. चामल हे जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके यांचे शरीर रक्षक होते. पस्तीस वर्षांचे नामल राजपक्षे हे महिंद्र यांचे मोठे पुत्र. २०१० मध्ये वयाच्या २४ व्या वर्षीच ते संसद सदस्य झाले. त्यांच्यावर मनी लॉड्रिंगचे आरोप झाले.

श्रीलंका आर्थिक संकटाच्या भोवऱ्यात प्रथमच सापडला आहे. श्रीलंकेच्या विदेशी गंगाजळीत खडखडाट आहे. जीवनावश्यक वस्तूंची आयात करायला या देशाकडे परकीय चलन नाही. देशात अन्नधान्य, साखर, दुधाची पावडर, फळे, औषधे यांची मोठी टंचाई आहे. देशात तेरा ते चौदा तास विजेचे लोडशेडिंग आहे. बसेससाठी डिझेल नसल्याने सार्वजनिक प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून श्रीलंका सतत नवनवीन कर्ज घेत आहेत. चीन, भारत व जपान या देशांकडून घेतलेल्या कर्जाखाली श्रीलंका बुडाली आहे. २०१८-१९ मध्ये पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी हंबनटोटा बंदर चीनला ९९ वर्षांच्या लीजवर देऊन टाकले. जागतिक बँक, आशियायी विकास बँक आदींची फार मोठी देणी श्रीलंकेच्या डोक्यावर आहेत. निर्यात वेगाने घटली असून व्यापारात दहा हजार कोटी डॉलर्सचा घाटा आहे. एका डॉलरची किंमत श्रीलंकेच्या ३९० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया यांनी देशातून पलायन केले. आधी ते मालदिव आणि नंतर सिंगापूरला पळाले. राजपक्षे देश सोडून पळाल्याचे कळताच जनता आणखी क्षुब्ध झाली. देशात अन्नधान्याची टंचाई आहे. महागाईने कळस गाठला आहे. देश कर्जबाजारीपणामुळे दिवाळखोरीत निघाला आहे आणि राष्ट्रपतींनीच देशातून पळ काढला आहे. संतप्त जमावाकडून कोलंबोमध्ये सरकारी व सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, लुटालूट आणि जाळपोळ सुरू झाल्याने पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी देशात आणीबाणी जारी केली. देशात अनेक ठिकाणी पोलीस व निदर्शक यांच्यात धुमश्चक्री बघायला मिळाली. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जनतेच्या उठावापुढे श्रीलंकेच्या सैन्यदलाने आपली शस्त्रे खाली ठेवली आहेत. नॅशनल टीव्ही चॅनेल असलेल्या रूपवाहिनीच्या स्टुडिओवरही निदर्शकांनी कब्जा मिळवला. निदर्शकांवर हेलिकॉप्टरमधून लक्ष ठेवले जात आहे. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी ठिकठिकाणी हवेत गोळीबार केला जातो आहे. श्रीलंकेतील घडामोडींची भारताने दखल घ्यावी अशी मागणी तेथील जनतेकडून होत आहे. राष्ट्रपतीपदावर असताना गोटाबाया हे दुसऱ्या देशात पळून गेले की त्यांना पळवून लावले? हा प्रश्न लाखमोलाचा आहे. गोटाबाया यांना अमेरिकेत जायचे होते, त्यांच्याकडे श्रीलंका व अमेरिका असे दुहेरी नागरिकत्व होते. पण २०१९ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढण्यापूर्वी त्यांनी अमेरिकन नागरिकत्व सोडून दिले. देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने श्रीलंकेतील घटनेनुसार एकाच देशाचे नागरिक असणे आवश्यक आहे.

दि. १५ जुलै २०२२ रोजी राजपक्षे परिवाराच्या विरोधात देशात प्रक्षोभ सुरू झाला व सरकारने खाद्यपदार्थांवर आणीबाणी जारी केली. २ एप्रिल रोजी राष्ट्रपती निवासाबाहेर हिंसक निदर्शने झाली. ४ एप्रिल रोजी पंतप्रधान महिंद्र राजपक्षे यांचा मुलगा नामलसह २६ मंत्र्यांनी एकाच वेळी राजीनामे दिले. ९ मे रोजी महिंद्र राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. रानिल विक्रमसिंघे पंतप्रधान झाले. ५ जुलै रोजी विक्रमसिंघे यांनी श्रीलंका दिवाळखोर झाल्याची घोषणा केली. ९ जुलै रोजी आंदोलकांनी राष्ट्रपती भवनात घुसखोरी केली व ताबा मिळवला. १० जुलै रोजी निदर्शकांनी विक्रमसिंघे यांच्या निवासाला आग लावली. जनमताच्या रेट्यापुढे गोटाबाया यांनी राजीनामा पत्रावर स्वाक्षरी केली. श्रीलंकेत नवीन राष्ट्रपतीपदासाठी २० जुलै रोजी निवडणूक होणार आहे. गेले महिनाभर श्रीलंकेतील अराजकाकडे सारे जग पाहत आहे. पण कोणीही हस्तक्षेपासाठी पुढाकार घेतला नाही.

राजकीय अस्थिरतेमुळे संपूर्ण देशात असंतोष माजला आहे. महागाई, टंचाई, भ्रष्टाचार, अनागोंदी, बेरोजगारीच्या संकटात श्रीलंकेची जनता भरडली जात आहे. देशात भविष्य अंधारमय असल्यामुळे श्रीलंकेतील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात देश सोडण्याच्या प्रयत्नात आहे. कोलंबो व अन्य शहरातील पासपोर्ट कार्यालयाच्या बाहेर तरुणांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत.

[email protected] [email protected]

Comments
Add Comment