मीनाक्षी जगदाळे
आजही आपल्या समाजाची वृत्ती, मानसिकता आणि दृष्टिकोन अविवाहित, घटस्फोटित आणि विधवा महिलांकडे पाहताना नकारात्मक, दूषित आणि कलुषित असल्याचे जाणवते. वास्तविक फक्त समाजच नाही, तर त्यांचे कुटुंबच त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देत असते. एखादी महिला आयुष्यभर कोणत्याही कारणास्तव अविवाहित राहिली अथवा तिचा घटस्फोट झाला किंवा दुर्दैवाने ती विधवा झाली तर तिने खूप मोठे काही पाप केले आहे आणि आता तिला समाजात सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणे जगण्याचा, वावरण्याचा हक्क, अधिकार नाही हे जणू गृहीत धरले जाते. ती नोकरी, व्यवसाय करणारी असेल तरी तिला त्या ठिकाणी सहकार्याच्या विचित्र मानसिकतेला तोंड द्यावे लागते. ती ज्या ठिकाणी राहाते तेथील शेजारी देखील तिच्याबाबतीत भेदभाव करताना दिसतात.
अशा महिलांना हिन दर्जाची वागणूक देण्यामध्ये समाजातील इतर सौभाग्यवती, विवाहित महिलाच जास्त अग्रेसर असल्याचे जाणवते. अनेक ठिकाणी कोणाचीही पत्नी म्हणून संसार-प्रपंच सांभाळणाऱ्या महिला एकाकी जीवन जगणाऱ्या महिलांचा तिरस्कार का करतात याचा अभ्यास केला, तर लक्षात येते की, अशा महिलांमुळे त्यांचे घर, संसार उद्ध्वस्त होत आहेत असे त्यांचे आजपर्यंतच निरीक्षण आणि तसेच त्यांचे अनुभव आहेत. तिच्या मागे-पुढे कोणी नाही. पण माझ्या नवऱ्याला तिने नादी लावले, माझ्या घरात ती घुसली, माझ्या नवऱ्याने तिला ठेऊन घेतली, तिनं आमचं कुटुंब बरबाद केलं, माझ्या नवऱ्याचा पैसा तिला मजा मारायला हवाय म्हणून तिनं त्याला जाळ्यात ओढला यासारखे आरोप अविवाहित, घटस्फोटित आणि विधवा महिलांवर सर्रास होताना दिसतात. याही पलीकडे जाऊन अतिशय हिन, निकृष्ट दर्जाचे शब्द त्यांच्यासाठी वापरले जातात. काही अंशी यामध्ये सत्यता असल्याचे देखील पाहायला मिळते. आपल्याला मिळत नसलेले सुख मिळविण्यासाठी या महिला इतरांचे संसार मोडकळीस आणताना पाहायला मिळते.
मुळात अशी परिस्थिती ओढवलेल्या महिलांना कुटुंबातील लोक सांभाळून समजावून घेत नाहीत. आयुष्यभर त्यांची अथवा त्यांच्या मुलांची जबाबदारी मोठ्या मनाने स्वीकारायला कुटुंब तयार होत नाही. थोडीफार आर्थिक बाजू भक्कम असेल तर कुटुंबात आपला कोणाला त्रास नको म्हणून या महिला वैयक्तिक वेगळे राहणे स्वीकारतात. थोडीफार स्थावर मालमत्ता, घरदार असल्यावर तर बहुतांशी या महिला परत विवाहाचा विचारच सोडून देतात. स्वतंत्र जगण्याची, एकटे राहण्याची, मुलांकडे पाहून आयुष्य काढण्याची सवय त्यांना अंगवळणी पडून जाते. या महिला स्वतःच्या पायावर उभे राहून उदरनिर्वाह करण्याइतकी खटाटोप देखील करतात. त्यात यशस्वी पण होतात. पैसा, प्रॉपर्टी मुलांच्या नावावर मिळते. त्यामुळे आर्थिक दृष्टीने या महिला सुरक्षित होतात.
असे असून सुद्धा या महिला आयुष्यात प्रचंड भरकटलेल्या दिसतात आणि कदाचित त्यामुळेच त्या स्वतःच्या रक्ताच्या इतर नातेवाइकांपासून दुरावतात. मनमानी कारभार आणि स्वैर जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारल्यावर त्यांना कोणाचेही कोणत्याही स्वरूपाचे बंधन नको वाटते. कुटुंबातील लोकांना देखील त्या जुमानत नाहीत, असे जाणवते. विवाहित अथवा अविवाहित पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये संपूर्ण आयुष्य घालवणे अशक्य आहे, ते कधीही यशस्वी होऊ शकत नाही हे माहिती असून सुद्धा स्वतःला प्रेमाच्या, भावनांच्या खोट्या मृगजळात त्या अडकवून घेतात. मुलांना नको त्या वयात नको ते पाहायला आणि स्वीकारायला लागणे याचा मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत राहतो आणि शेवटपर्यंत एकाकीपणाच वाट्याला येतोय अशी शेकडो उदाहरण समुपदेशन दरम्यान दिसतात.
तात्पुरता मिळणारा आर्थिक लाभ असो, तात्पुरती भागणारी शारीरिक गरज असो, स्वतःच्या मनाचे समाधान करण्यापुरता घेतलेला पर पुरुषाचा आधार असो हे कोणत्याही वेळी थांबू शकतं, संपू शकतं ही जाणीव असून सुद्धा, हा मार्ग चुकीचा आहे माहिती असून सुद्धा स्वतः त्या हे सर्व थांबवू शकत नाहीत हेच खरं दुर्दैव आहे. अशावेळी त्यांना त्यांच्या कुटुंबाने सावरणं आवश्यक आहे.
पुरुष शक्यतो विवाहबाह्य संबंध ठेवण्याचे मोठे साधन अथवा माध्यम म्हणून अशा महिलांकडे बघतो आणि एकट्या महिला देखील या आधाररूपी पुरुषाच्या आधीन जातात हे दुर्दैव आहे. आर्थिक, मानसिक, भावनिक बाबतीत एकटी राहणारी स्त्री कितीही खंबीर आणि सक्षम झाली तरी तिला प्रेम, आदर, आपुलकी, जिव्हाळा, शारीरिक गरजा यासाठी जोडीदाराची उणीव भासतेच आणि त्यातूनच आयुष्यात आलेल्या विवाहित अथवा अविवाहित पुरुषांना अशा महिला पटकन उपलब्ध होतात.
एकाकी जीवन जगणाऱ्या अविवाहित, घटस्फोटित आणि विधवा महिलांना त्यांचं आयुष्य जगण्याचा निश्चित अधिकार आहे पण त्यासाठी सरळ, कायदेशीर, नैतिक मार्ग त्यांनी स्वीकारला तर नक्कीच त्या कायमस्वरूपी पुरुषाचा भक्कम आधार मिळवू शकतात. पुनर्विवाह करणे, दुसरा समदुःखी जोडीदार शोधून, थोडीफार तडजोड करून स्वतःचं पत्नी म्हणून अस्तित्व त्या नक्कीच निर्माण करू शकतात. एकदा वाईट अथवा कटू अनुभव आला म्हणून आयुष्यभर भटकत बसण्यापेक्षा हक्काचा जोडीदार शोधून स्थिर होणं निश्चित फायद्याचे असेल.
एकाकी आयुष्य व्यतीत करणाऱ्या या महिलांना विवाहित पुरुषांसोबत ठेवलेले संबंध कुठल्याही कायद्याने, समाजाने, कुटुंबाने मान्य केल्याचे दिसत नाही. त्यांना कुठेही पत्नीचा कायदेशीर दर्जा दिला जात नाही, त्यांचा फक्त गैरफायदा घेतला जाऊन त्यांना बदनामीला सामोरं जावं लागत हे त्रिकालाबाधित सत्य आहे. प्रेम! या गोंडस शब्दाचा गैर अर्थ आणि गैर आधार घेऊन या महिला स्वतःची खोटी प्रतिमा स्वतःच्याच मनात तयार करतात. अशा महिलांचे पुनर्वसन करणे, त्यांना योग्य दिशा दाखवणे हे त्यांच्याच कुटुंबाच्या हातात आहे. अशा महिलांना भावनिक, मानसिक पातळीवर समजावून घेऊन, त्यांना बोज न समजता त्यांना योग्य निर्णयात साथ देऊन त्यांना समाजात ताठमानेने जगण्यासाठी ताकद त्यांच्या कुटुंबाने द्यायला हवी. सर्व कुटुंबाने एकत्र येऊन अशा महिलांना आयुष्यात कायमस्वरूपी सेटल करणं त्यांची जबाबदारी आहे. आपल्याला आनंद मिळवण्याच्या नादात आपण इतरांना दुःखी करणार नाही याची पूर्ण जबाबदारी अशा महिलांनी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी घेणे क्रमप्राप्त आहे.त्यामुळे कोणाच्याही आभासी बोलण्याला भाळून आपलं आयुष्य खड्ड्यात घालण्यापेक्षा जे उघड्या डोळ्याने दिसते आहे ते सत्य स्वीकारून आपणच आपला नैतिक मार्ग शोधावा हाच संदेश देण्यासाठी हा लेखप्रपंच.