Tuesday, October 8, 2024
Homeअध्यात्मपर्यावरण हाच नारायण

पर्यावरण हाच नारायण

परमेश्वराची खरी ओळख कधी होते? “आधी देवासी ओळखावे, मग तयाचे स्मरण करावे. अखंड ध्यानची धरावे पुरुषोत्तमाचे”। स्मरण प्रथम, मग ध्यान, मग ध्यास. देवाशिवाय काहीही न सुचणे व देवाशिवाय काहीही न रुचणे अशी अवस्था होणे ही किती आनंदाची गोष्ट आहे. लोक आज देवाला विसरतात. परमेश्वराच्या अस्तित्वावर हे जग चाललेले आहे हे जोपर्यंत ध्यानांत येत नाही. तोपर्यंत मानवजात सुखी होणे शक्य नाही. जीवनांत सर्व काही अरिष्ट निर्माण होते. त्याला कारण देवाचा विसर आहे. निसर्गाचा कोप होतो. त्यालाही कारण देवाचा विसर, सुनामी येते, भूकंप होतो, प्रलय होतो हे कुणाचे पाप? मानवजातीचे पाप. पाप म्हणजे तरी काय? माणूस देवाला विसरला म्हणून त्याच्याकडून पर्यावरणाची हानी होऊ लागली. पर्यावरण बिघडल्यामुळे निसर्गाचा कोप झाला. निसर्गाचा कोप झाल्यामुळे या सर्व गोष्टी घडू लागल्या. पर्यावरण हाच नारायण असा आम्ही सिद्धांत मांडला. आपण फक्त विकास पाहिजे, असे म्हणतो. अरे पण पर्यावरण बिघडते त्याचे काय? पर्यावरण की विकास असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पर्यावरण महत्त्वाचे हेच त्याचे उत्तर आहे. पर्यावरण राखले तर विकासाला अर्थ आहे आणि पर्यावरण राखले नाही तर विनाश निश्चित आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरण बिघडते, निसर्गाचा कोप होतो व मानव हतबल होतो. जी परिस्थिती जपानवर आली ती इतरांवर येऊ कशते. आज ते जात्यात आहेत व इतर सुपात पण कधीतरी इतर सुपात येऊ शकतात. ते येऊ नये असे वाटत असेल तर पर्यावरण राखले पाहिजे. पर्यावरण राखायचे की बिघडवायचे हे कुणाच्या हातात आहे हे माणसाच्या हातात आहे. पर्यावरण का बिघडले? माणसाचे विचार बिघडल्यामुळे प्रदूषण निर्माण झाले. विचार का बिघडले? त्याचे मूळ कारण अज्ञान. अज्ञान सर्व गोष्टींचे आहे. परमेश्वराबद्दलचे अज्ञान, निसर्गाबद्दलचे अज्ञान, पर्यावरणाबद्दलचे अज्ञान या सर्व गोष्टींच्या अज्ञानामुळे त्याची प्रगती न होता त्याची वाटचाल विशानाच्या दृष्टीने चाललेली आहे. “आधी देवासी ओळखावे, मग तयाचे स्मरण करावे. अखंड ध्यानची धरावे पुरुषोत्तमाचे”। स्मरण हिच उपासना. खरे स्मरण झाले पाहिजे. परमेश्वर आहे कुठेतरी? असे समजून काहीतरी करत राहातो याला काही अर्थ नाही. देवाचे स्मरण हे देवाच्या ओळखीने होते. देवाचे स्मरण करणे ही गोष्ट सामान्य नाही.

– सदगुरू वामनराव पै

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -