राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच भाजपप्रणीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड दिसत होते. भाजपने आपला उमेदवार जाहीर करून देशातील सर्वच राजकीय पक्षांना धक्का दिला. आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांना विरोध करायचा तरी कसा, अशा प्रश्नाने विरोधी पक्ष बुचकळ्यात पडले होते. एकीकडे भाजपची राष्ट्रपती निवडणुकीसाठी मजबूत तयारी होतीच. पण दुसरीकडे विरोधी पक्षाला सर्वमान्य असा सहमतीने उमेदवारही ठरवताना नाकीनऊ आले. विरोधकांना आपला उमेदवार ठरवता येत नाही आणि आपल्या पक्षाच्या आमदार- खासदारांची मतेही राखता आली नाहीत. एवढेच नव्हे तर भाजप विरोधकांची एकजूटही या निवडणुकीत टिकवता आली नाही. या सर्वांचा लाभ भाजपला झाला. मतमोजणीनंतर द्रौपदी मुर्मू यांची देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाल्याची घोषणा होणे फक्त बाकी आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी देशात १८ जुलै रोजी मतदान झाले. गुजरातपासून ते उत्तर प्रदेश, हरियाणापर्यंत अनेक राज्यात काँग्रेस, सपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटली आणि या पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याचे उघड झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व सपाने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचे नाव घोषित केले होते. शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना शिवसेनेचे रोज सकाळ-संध्याकाळी टीव्हीच्या पडद्यावर झळकणारे प्रवक्तेही हजर होते. मुख्य म्हणजे ज्या महाआघाडी सरकारचे नेतृत्व शिवसेनेने महाराष्ट्रात अडीच वर्षे केले, त्याच पक्षाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांना ठेंगा दाखवला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार व सोनिया गांधी यांच्या पाठिंब्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे उपभोगले. पण त्या दोन्ही पक्षाला त्यांच्या पक्षाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत चाट मारली व त्यांनी अडीच वर्षे दिलेल्या पाठिंब्याचे पांग फेडले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा आणि शिवसेनेला द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात जो उमेदवार दिला तो पक्षातच अनेकांना मान्य नव्हता. पक्षाचे नेते कोणाला काय वाटते याचा विचार न करता परस्पर निर्णय लादतात त्याचा परिणाम क्राॅस व्होटिंगमध्ये झाला. या निवडणुकीत शिवसेनेने भाजप विरोधी आघाडीचा निर्णय साफ झुगारून लावलाच. पण भाजप विरोधी आघाडीतील अनेकांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याचे जाहीरपणे सांगून पक्षाचा आदेश आपणास मान्य नाही, असे दाखवून दिले. झारखंडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने यशवंत सिन्हा यांना मतदान न करता द्रौपदी मुर्मू यांना केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. मतदान करून बाहेर आल्यानंतर त्यांनी स्वत:च आंतरात्म्याचा आवाज ऐकून आपण द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याचे सांगून टाकले.
गुजरातमधील भारतीय ट्रायबल पार्टीचे नेता छोटुभाई वसावा यांनीही द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले. ज्यांनी गरिबांच्या भल्यासाठी सदैव काम केले, त्यांना आपण मतदान केल्याचे त्यांनी सांगितले. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात या निमित्ताने फाटाफूट बघायला मिळाली. अखिलेश यांचे काका व प्रसपा प्रमुख शिवपाल यादव यांनी उघडपणे द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले. सपाचे आमदार शहजील इस्लाम यांनीही द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. भोजीपुरामधून आमदार झालेले इस्लाम हे पक्ष नेतृत्वावर गेले काही दिवस नाराज असल्याची चर्चा आहे, त्याची प्रचिती राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानात दिसून आली. शिवपाल यादव यांनी तर अगोदरच जाहीर केले होते की, ज्या व्यक्तीने मुलायम सिंह यादव यांच्यावर ते सीआयएचे एजंट असल्याचा आरोप केला होता, त्याला आपण मतदान करणार नाही. जे मुलायम सिंह यांच्या भावाला समजते ते त्यांच्या पु्त्राला का समजले नाही, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो. केवळ भाजपला विरोध म्हणूनच सपाने द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीला विरोध केला हेच त्यातून स्पष्ट होते.
ओरिसामधील काँग्रेसचे आमदार मोहम्मद मुकीम यांनी पक्षाचा निर्णय झुगारून द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले. त्यांना म्हणे पक्षाने प्रदेशाध्यपद दिले नाही म्हणून ते पक्षावर नाराज होते असे सांगितले जाते. पण पक्षाला आव्हान देण्यापर्यंत त्यांची मजल गेली याचा अर्थ यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारीविषयी काँग्रेस गंभीर नव्हती का? झारखंडमधेही काँग्रेसच्या आमदारांनी क्राॅस व्होटिंग केल्याची माहिती पुढे आली आहे. हरियाणामधेही काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. पक्षाचे आमदार कुलदीप वैष्णवी यांनीच भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. अंतरात्म्याचा आवाज ऐकून आपण मतदान केल्याचे ते म्हणाले. या अगोदर झालेल्या राज्यसभा निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसऐवजी भाजप समर्थित उमेदवाराला मतदान केले होते. याचा दुसरा अर्थ काँग्रेस, सपा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वाचा पक्षावर धाक राहिलेला नाही असा होतो.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झाला. तसेच विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंगचा फटका तत्कालीन ठाकरे सरकारमधील दोन्ही पक्षांना बसला. त्यानंतरही कोणी आत्मचिंतन केले नाही व कोणावर कारवाई झाली नाही. नियमानुसार राष्ट्रपती निवडणुकीत, तर कोणत्याही पक्षाला व्हीप काढता येत नाही. त्यामुळे आमदार किंवा खासदारांना आपल्या मर्जीप्रमाणे मतदान करता येते. क्रॉस व्होटिंगचा फायदा राज्यात जसा भाजपला झाला तसाच राष्ट्रपती निवडणुकीतही होणार हे निश्चित.