सुभाष म्हात्रे
अलिबाग : महिनाभरावर आलेल्या गणेशोत्सवासाठी पेण येथून लाखो गणेशमूर्ती विक्रीसाठी देशभरात रवाना झाल्या आहेत, तर तितक्याच मूर्तींवर कारागिर शेवटचा हात फिरवीत असतानाच पीओपीवरील बंदी कायम ठेवण्याच्या निर्णयाने गणपती कारखान्यातील लगबग अचानक मंदावली आहे.
श्रींचे माहेरघर म्हणून पेण तालुक्याकडे पाहिले जाते. विशेषतः पीओपीपासून बनविलेल्या गणपतीच्या मूर्तींना चांगली मागणी असल्याने पेण तालुक्यातील हजारो कारागिरांनी या व्यवसायात स्वतःला गुंतवून घेतले आहे. परंतु पीओपीवरील बंदी कायम ठेवण्याच्या निर्णयाने हा व्यवसाय आता आर्थिक संकटात सापडला आहे.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे लॉकडाऊन आणि महापुरात नुकसान झालेल्या मूर्ती यामुळे कारखानदारांवरील कर्जाचा बोजा वाढतच चाललेला आहे. पेण येथून पीओपीपासून तयार केलेल्या मूर्ती इतर शहरांमध्ये व्यापारी विक्रीसाठी नेतात. हे व्यापारी नेहमीचे असल्याने मूर्तींची विक्री झाल्यानंतरच मूर्तींची मूळ रक्कम कारखानदारांना परत करत असतात. मात्र पीओपी मूर्त्यांच्या बंदीमुळे मूर्तींची अपेक्षीत किंमत देण्यास ग्राहक तयार होणार नाहीत.
जर का स्थानिक प्रशासनाने पीओपीवरील बंदीची सक्तीने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केल्यास पाठविलेल्या काही मूर्त्या न विकताच परत येऊ शकतात. याचा मोठा फटका येथे घरोघरी चालणाऱ्या गणेशमूर्ती कारखानदारीला बसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे गणेशमूर्ती कारखानदारांचे म्हणणे आहे.
गणेशमूर्ती बनविण्यासाठी केलेली गुंतवणूक पुन्हा काढून घेता येणे शक्य नाही. कच्चा माल, रंगरंगोटी, कारागिरांची मजुरी दिलेली आहे. काही मूर्त्या बाजारात दाखल झालेल्या असताना कायम ठेवण्यात आलेल्या बंदीमुळे मूर्ती कारागिर आर्थिक संकटात सापडणार आहेत. राज्यात मूर्तीकलेवर साधारणत: २२ लाख जणांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांनाही याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. – रविकांत (अभय) म्हात्रे, अध्यक्ष- श्रीगणेश मुर्तीकार प्रतिष्ठान, महाराष्ट्र
शाडुच्या मूर्तीपेक्षा पीओपीची मूर्ती हलकी असते. तसेच वाहनांतून नेतानाही भिती नसते. शाडुच्या मूर्ती वजनाने जास्त असतात आणि त्यांची वाहतूक करताना सांभाळून करावी लागते. पीओपीची मूर्ती भिजल्यास या मूर्तीला सुकविता येते. याउलट शाडुच्या मूर्तीला पाण्याची भिती अधिक असते. पीओपीच्या मूर्तींवर बंदी आल्यास मूर्तीकारांना मोठा फटका बसू शकतो. – महेश घरत, मूर्तीकार, सायली कला केंद्र, अलिबाग