Wednesday, April 23, 2025
Homeकोकणरायगडकर्जत - पुण्यातील दुर्गप्रेमींनी शोधला ‘साबईगड’ किल्ला

कर्जत – पुण्यातील दुर्गप्रेमींनी शोधला ‘साबईगड’ किल्ला

‘टेहळणीचा किल्ला’ असल्याचा निष्कर्ष

कर्जत (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील साबईगड हा डोंगरी किल्ला असल्याचे कर्जत आणि पुण्यातील दुर्गप्रेमी मित्रांच्या शोध मोहिमेतून समोर आले आहे. काळाच्या प्रवाहात हरवलेला साबईगड हा एक गिरिदुर्ग असल्याची माहिती कर्जत आणि पुण्यातील दुर्गप्रेमींनी दिली व एक अप्रकाशित किल्यावर प्रकाश टाकला आहे. हा किल्ला टेहळणीचा असल्याचे अनेक भेटी देत तसेच माहिती गोळा करत या दुर्गप्रेमींनी ही शोधमोहीम इतिहास अभ्यासक तसेच दुर्ग तज्ज्ञांसमोर मांडली आहे.

पुण्यातील निहार श्रोत्री, तसेच कर्जत येथील मंदार लेले, अभिजीत मराठे, शर्वरीश वैद्य, कौस्तुभ परांजपे आणि भाविक आव्हाड गेल्या वर्षी साबई डोंगरावर भटकंतीसाठी गेले असता हा एक धार्मिक डोंगर असून येथे एक देवीचे मंदिर आहे, अशी जुजबी माहिती मंदार लेले आणि निहार श्रोत्री ह्यांना स्थानिकांकडून मिळाली होती; परंतु या डोंगरावर त्यांना अनेक दुर्ग स्थापत्य अवशेष आढळून आले. गडाचे भौगोलिक स्थान हे अक्षांश १८.८४५९६३ रेखांश ७३.२९०२०७ असून चौकाजवळील माणिकगडापासून याचे अंतर १८ कि.मी., इर्शाळगड १४ कि.मी., सोंडाई किल्ला १७ कि.मी., तर कर्जत तालुक्यातील सोनगिरी किल्ला हा ७ कि.मी. अंतरावर आहे.

या दुर्गप्रेमींनी शोधलेला साबईगड हा खालापूर आणि कर्जत तालुक्यांच्या सीमेवर असून वर जाण्यासाठी खालापूर तालुक्यातील कलोते या गावातून वाट आहे. गडावरील चढाई सोपी असून जायला तीन वाटा आहेत. प्रामुख्याने सोपी आणि पहिली वाट कलोते गावातून थेट गडावर जाते. दुसरी वाट ही गावाजवळील माधवबाग आयुर्वेदिक केंद्राच्या मागून गडावर जाते आणि तिसरी वाट ही खालापूर फाट्याजवळून गडावर जाते. डोंगरावर साबई मातेचे धार्मिक स्थान असून देवीची मूर्ती तांदळा स्वरूपातील आहे. साबई डोंगरावर दुर्ग स्थापत्याच्या अंगाने असलेले अनेक अवशेष आढळून आले आहेत. त्यात एका पाषाणावर वीर देवाची कोरीव मूर्ती असून अनेक ठिकाणी खडकात ओळीने कोरीव पायऱ्या आहेत.

साबई देवीच्या ठिकाणाहून डावीकडून पुन्हा पंधरा पायऱ्या बालेकिल्ल्यावर जातात. गडमाथा चिंचोळा आहे. गडावर टेहाळणीची जागा असून तिथे बांधकामाचे जोते दिसून येते. तसेच पाण्याची टाकी देखील आढळून आलेली आहे. गडमाथ्यावरून सोंडाई, माणिकगड, सोनगिरी, इर्शाळ ह्या किल्ल्यांप्रमाणे राजमाची, प्रबळगड, ढाकबहिरी हेसुद्धा किल्ले नजरेच्या टप्प्यात येतात. साबईगडा जवळूनच बोरघाटाला जाण्याचे रस्ते आहे. त्यामुळे या गडाचा प्रामुख्याने वापर हा चौकी पहारा देणे तसेच टेहेळणी इत्यादी साठी झालेला असण्याची शक्यता आहे.

पुणे आणि कर्जत येथील या गिरिप्रेमी मंडळींनी केलेल्या संशोधनातून खालापूर तालुक्यातील साबई गड हा फक्त धार्मिक डोंगर नसून तो एक गिरिदुर्ग असून त्याचा टेहेळणीचा किल्ला म्हणून उपयोग झाला असल्याचे समोर आले आहे. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या १९व्या गिरिमित्र संमेलनात साबईगडाचे अभ्यासपूर्ण सादरीकरण करण्यात आले असून या मोहिमेला ट्रेकक्षितिज संस्थेचे अमित सामंत, पुण्यातील इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर तसेच नाशिकमधील दुर्ग अभ्यासक गिरीश टकले यांचे मार्गदर्शन लाभले. या शोधमोहिमेमुळे महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांच्या यादीत एका गिरिदुर्गाची भर पडली आहे, हे विशेष होय.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -