शैलेश रेड्डी
दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेत भाजपला कर्नाटकपलीकडे फार मजल मारता आलेली नाही. आता उत्तर, पश्चिम तसेच ईशान्य भारतात भाजपच्या वाढीची शक्यता नाही. त्यामुळे हा पक्ष दक्षिण भारत, पश्चिम बंगाल आणि ओडिशासारख्या राज्यांमध्ये दिग्विजयाला निघाला आहे. याच सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीला मूठमाती देण्याचं आवाहन करत असताना आंध्र प्रदेशमध्ये सत्ताधारी पक्षातला कुटुंब कलह चव्हाट्यावर आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच तेलंगणा, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याची तयारी भाजपने आताच सुरू केली आहे. कर्नाटक आणि पुद्दुचेरीमध्ये भाजपची सत्ता आहे. गेल्या वर्षी हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत भाजप ज्या पद्धतीनं उतरला होता आणि ज्या पद्धतीनं तिथं जागा जिंकल्या ते पाहता भाजप आता तेलंगणामध्येही तेलंगणा राष्ट्र समितीला पर्याय ठरू पाहतो आहे. आंध्र प्रदेशमध्ये सत्ताधारी वायएसआर काँग्रेसलाही आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये तेलंगणा राष्ट्र समितीने हे आव्हान ओळखून भाजपविरोधात मोहीम उघडली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार, एम. के. स्टॅलिन यांच्याशी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे संबंध चांगले झाले आहेत. राव यांनी राष्ट्रीय राजकारणात उतरून मोदी यांना पर्याय तयार करण्याची मनीषा बाळगली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने अलीकडेच हैदराबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. हैदराबादचं नामकरण भाग्यनगर करण्याचं जाहीर करून त्यातून ध्रुवीकरणावर भर दिला. हैदराबादमध्ये दोन दिवस चाललेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये दक्षिणेकडील राज्यांसह ईशान्येकडील राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार करण्याबरोबरच पुढील ३०-४० वर्षं केंद्रात राहण्याचा संकल्पही करण्यात आला. घराणेशाहीच्या राजकारणाविरुद्ध देशभरात संघर्षाची घोषणा करण्यात आली. मुस्लीम समाजातल्या मागासलेल्या घटकांमध्ये प्रवेश करण्याची रणनीती आखण्यात आली.
या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातले सरकार कुटुंबवादी आणि भ्रष्ट असल्याचे सांगत राज्यातल्या जनतेला डबल इंजिन सरकार स्थापन करण्याचं आवाहन केलं. ही सर्व उद्दिष्टं भाजपला गाठता येणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हैदराबादमध्ये १८ वर्षांनंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही तिसरी बैठक आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीबाहेर ही पहिलीच बैठक होती. तेलंगणामध्ये भाजप पाय पसरण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असताना ही बैठक झाली. सभेच्या निमित्ताने देशभरातल्या भाजप नेत्यांनी तेलंगणातल्या सर्व ११९ विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पुढील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्वतः अनेक दिवस तेलंगणाचा दौरा केला. भाजपच्या डबल इंजिन सरकारचा नारा हा पक्ष या राज्यात स्वबळावर सरकार स्थापन करण्याबाबत गंभीर असल्याचं दाखवणारा होता.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीचा समारोप अनेक अर्थानं महत्त्वाचा ठरला असून हैदराबादच्या परेड ग्राऊंडवर झालेल्या विजय संकल्प सभेत पंतप्रधान मोदींनी आपला हेतू स्पष्ट केला. ते म्हणाले की, तेलंगणातले लोक दुहेरी इंजिन विकासासाठी तळमळत आहेत. राज्यात भाजपची सत्ता आल्यावरच त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. भाजपची सत्ता आल्यावर या राज्यातल्या विकासाचा वेग वाढेल. तेलंगणा हा तेलंगणा राष्ट्र समितीचा मजबूत बालेकिल्ला आहे. शिवसेनेत पाडली तशी फूट तिथे पाडता येईल, अशीही स्थिती नाही. केसीआर यांचा हा बालेकिल्ला मिळवणं हे भाजपसमोरील मोठं आव्हान आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला इथे केवळ एक जागा जिंकता आली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ५ जागा जिंकल्या होत्या.
असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाने इथे सात जागा लढवून सर्व जिंकल्या. केसीआरच्या तेलंगणा राष्ट्र समितीने ११९ पैकी ८८ जागा जिंकल्या. ४६.९ टक्के मतं मिळवून हा पक्ष पुन्हा सत्तेत आला. प्रमुख विरोधी पक्ष असलेली काँग्रेस २८.५ टक्के मतांसह केवळ १९ जागांवर घसरली. अशा परिस्थितीत तेलंगणामध्ये आपला विस्तार करणं हे भाजपसमोरचं खडतर आव्हान आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांना पंतप्रधान मोदी यांच्या हेतूची आधीच कल्पना होती. त्यामुळेच त्यांनीही भाजपशी टक्कर घेण्याचे आपले मनसुबे लपवले नाहीत.
अलीकडे शिवसेनेत निधी आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरून दुफळी माजली. एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतून बाहेर पडला. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली. मोदी यांनी घराणेशाही आणि कुटुंबापुरत्या मर्यादित राजकारणाला विरोध केला. शिवसेनेत फूट पडल्याच्या घटनेला अजून महिना पूर्ण झाला नाही तोच आता आंध्र प्रदेशमध्येही वायएसआर काँग्रेसमध्ये कौटुंबिक कलह निर्माण झाला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीही आपल्या प्रियजनांच्या कारस्थानामुळे त्रस्त आहेत; परंतु जगनमोहन रेड्डी यांनी वेळीच आपलं स्थान मजबूत केलं आहे. पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करून त्यांनी स्वतःला पक्षाचं तहहयात अध्यक्ष बनवलं आहे. जगनमोहन रेड्डी यांची सत्ताधारी ‘युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टी’ (वायएसआरसीपी)च्या आजीव अध्यक्षपदी निवड झाली आहे. पक्षाच्या अधिवेशनात या संदर्भातली घोषणा करण्यात आली. वायएसआरसीपीचे सरचिटणीस व्ही. विजयसाई रेड्डी यांनी जगनमोहन रेड्डी यांची पक्षाच्या आजीव अध्यक्षपदी एकमतानं निवड झाल्याची घोषणा केली. पक्षाध्यक्ष निवडीसाठी रिटर्निंग ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. अन्य एकाही नेत्यानं या पदासाठी अर्ज भरला नाही. निवडणूक आयोगाकडून याला मंजुरी मिळेल, असा विश्वास पक्षाला आहे. पक्षातर्फे यासंदर्भात द्रमुकचा हवाला दिला. निवडणूक आयोगाने एम. करुणानिधी यांना आजीवन पक्षप्रमुख म्हणून नामनिर्देशित करण्याची परवानगी दिली होती.
काँग्रेस पक्षातून फुटून ‘वायएसआर’ काँग्रेसची स्थापना झाली. जगन यांच्याकडे वायएसआर काँग्रेसची सूत्रं सोपवण्यापूर्वी त्यांची आई विजयम्मा यांनी वायएसआर काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला यांनी शेजारच्या तेलंगणा राज्यात वायएस तेलंगणा नावाचा वेगळा पक्ष स्थापन केला आहे. कौटुंबिक मतभेदांमुळे विजयम्मा यांनी राजीनामा दिल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अलीकडेच झालेल्या वायएसआर काँग्रेसच्या अधिवेशनात त्या पक्ष कार्यकर्त्यांना म्हणाल्या, २०११ मध्ये मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवला होता आणि तुम्हाला त्याची काळजी घेण्यास सांगितलं होतं. आज पुन्हा एकदा मी जगनला तुमच्या सर्वांच्या स्वाधीन करते. जगन मोहन रेड्डी यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचं सप्टेंबर २००९ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी जगनने नव्या पक्षाची स्थापना करत राजकीय प्रवास सुरू केला. त्यांनी काँग्रेस पक्षाविरोधात बंडाचा झेंडा रोवला. दरम्यान, मुलाने नवा पक्ष स्थापन करताच जगन यांच्या आई वाय. एस. विजयम्मा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
आता विजयम्मा शेजारच्या तेलंगणा राज्यात आपली मुलगी आणि जगन यांची बहीण वाय. एस. शर्मिला यांच्या नेतृत्वाखालील राजकीय मोहिमेत सामील होणार आहेत. शर्मिला यांचं जगन यांच्याशी शीतयुद्ध सुरू आहे. तेलंगणामधल्या लोकांसाठी वाय. एस. राजशेखर रेड्डी यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या वाय. एस. शर्मिला यांच्यासोबत त्या उभ्या राहणार आहेत. याबद्दल अनेक अटकळी, अफवा पसरल्या आणि वाद झाला. त्यामुळे कुटुंबातले मतभेद, वाद मिटवण्यासाठी विजयाम्मा यांनी वायएसआर काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. ‘वाईट काळात, कठीण प्रसंगी आपल्या मुलीच्या पाठीशी उभं न राहिल्याबद्दल आपल्याला दोषी वाटत आहे. त्यामुळे विवेकाच्या आवाजावर मी वायएसआर काँग्रेसचं मानद अध्यक्षपद सोडत आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे. जगनमोहन रेड्डी आणि शर्मिला यांच्यात मालमत्तेशी संबंधित मुद्द्यांवरही वाद सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांमधली कटुता खूप वाढली असून विजयाम्मा आपल्या मुलापासून वेगळ्या रहात आहेत. भाजप तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीला, तर आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसला पर्याय होऊ पाहतो आहे. या दोन्ही राज्यांची सत्ता भाजपला हवी आहे. दोन्ही राज्यांमधल्या काँग्रेसच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याची भाजपची रणनीती आहे.